राज्यातल्या मागास जिल्ह्यात ३६४९ घरांपर्यंत वीज पोहोचलीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 16:12 IST2018-08-22T16:08:51+5:302018-08-22T16:12:00+5:30
देशभरातील आकांक्षित (मागास) जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या राज्यातील चार पैकी दोन जिल्ह्यांनी वीज पुरवठ्याचा लक्ष्यांक गाठत सर्व कुटुंबांमध्ये वीज पुरवठा सुरू केला आहे. मात्र गडचिरोली आणि नंदूरबार जिल्ह्यात अजून ३६४९ कुटुंबांना वीज पुरवठा मिळालेला नाही.

राज्यातल्या मागास जिल्ह्यात ३६४९ घरांपर्यंत वीज पोहोचलीच नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : देशभरातील आकांक्षित (मागास) जिल्ह्यांच्या यादीत असलेल्या राज्यातील चार पैकी दोन जिल्ह्यांनी वीज पुरवठ्याचा लक्ष्यांक गाठत सर्व कुटुंबांमध्ये वीज पुरवठा सुरू केला आहे. मात्र गडचिरोली आणि नंदूरबार जिल्ह्यात अजून ३६४९ कुटुंबांना वीज पुरवठा मिळालेला नाही. यातील बहुतांश कुटुंबिय नंदूरबार जिल्ह्यातील आहेत.
विस्तार ग्रामस्वराज अभियानांतर्गत केंद्र सरकारने प्रधानमंत्री ‘सहज बिजरी हर घर’ ही योजना आणली. त्यानुसार महाराष्ट्रातील गडचिरोली, नंदूरबार, उस्मानाबाद आणि वाशिम या चार आकांक्षित जिल्ह्यांमध्ये वीज पुरवठा नसलेल्या ३६ हजार १९९ कुटुंबांमध्ये वीज कनेक्शन देण्याचे लक्ष्य निश्चित केले होते. त्यात वाशिम जिल्ह्याने २१६५ तर उस्मानाबाद जिल्ह्याने ५७५९ कुटुंबांना वीज पुरवठा देऊन आपले १०० टक्के लक्ष्य गाठले आहे. मात्र नंदूरबार जिल्ह्याने २२ हजार ३७ कुटुंबांना वीज पुरवठा देण्याच्या लक्ष्यापैकी १८ हजार ४४५ कुटुंबांना वीज पुरवठा देऊन ९४.१५ टक्के लक्ष्य गाठले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ६ हजार २३८ कुटुंबांपैकी ६ हजार २१९ कुटुंबांना वीज देण्यात आली असून आता अवघ्या १९ कुटुंबांना वीज कनेक्शन देणे बाकी आहे.
या योजनेतून गडचिरोली जिल्ह्यातील २८१ गावांत, नंदूरबारमधील ५४७ गावांत, उस्मानाबादमधील ४८८ गावांत आणि वाशिम जिल्ह्यातील ३९१ गावांमध्ये सर्व कुटुंबात वीजेचा प्रकाश पाडला जात आहे. काही दिवसात दोन्ही जिल्ह्यात लक्ष्यपूर्ती होईल, असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.