वीज चोरीची नवी शक्कल
By Admin | Updated: July 19, 2014 23:54 IST2014-07-19T23:54:37+5:302014-07-19T23:54:37+5:30
संगणकीय विद्युत मीटर लावल्यानंतर विद्युत चोरीचे प्रमाण कमी होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र वीज चोरट्यांनी आता विद्युत मीटरच्या बाहेर परस्पर वायर जोडून त्याच्या

वीज चोरीची नवी शक्कल
देसाईगंज : संगणकीय विद्युत मीटर लावल्यानंतर विद्युत चोरीचे प्रमाण कमी होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र वीज चोरट्यांनी आता विद्युत मीटरच्या बाहेर परस्पर वायर जोडून त्याच्या माध्यमातून वीज चोरी सुरू केली आहे. मात्र याकडे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.
घरातील बहुतांश साधने विद्युतवर चालतात. त्यामुळे अन्न, वस्त्र, निवारानंतर वीज ही अत्यावश्यक बाब झाली आहे. वीज चोरीमुळे वीज वितरण कंपनीला कमी प्रमाणात महसूल गोळा होत असल्याने वीज चोरी ही वीज वितरण कंपनीसाठी फार मोठी व जुनी समस्या आहे. वीज चोरी थांबविण्यासाठी वीज वितरण कंपनीने अनेक उपाय योजले असले तरी वीज चोरीवर पूर्णपणे आळा घालण्यात वीज वितरण कंपनीला अजूनपर्यंत तरी यश प्राप्त झाले नाही.
पाच वर्षांपूर्वी चक्र असलेले वीज मीटर होते. या मीटरमधून वीजेची चोरी अगदी सहजपणे करता येत होती. अनेकांचे मीटर घरात असल्याने त्याकडे लक्ष देणेही वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना शक्य होत नव्हते. यावर उपाय म्हणून वीज वितरण कंपनीने संगणकाप्रमाणे असलेले अगदी पारदर्शक मीटर सध्या शहरी भागात लावण्यात आले आहेत. या या मीटरच्या आतील सर्वच बाबी अगदी स्पष्टपणे दिसत असल्याने या मीटरच्या सहाय्याने चोरी करणे शक्यच नाही, असा विश्वास वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना वाटत होता. मात्र वीज चोरट्यांनी त्यावरही उपाय शोधून काढला आहे. विद्युत खांबापासून मीटरपर्यंत वायर जोडण्यात येतो. त्यानंतर घरामध्ये विद्युतचा पुरवठा करण्यात येतो. घरात वापरण्यात येणारी वीज मीटरमधूनच जात असल्याने जेवढे युनिट वापरले जातात. तेवढ्यांची नोंद घेतल्या जाते. मात्र वीज चोरट्यांनी विद्युत खांबापासून आलेल्या वायरला मीटरच्या बाहेरून एक स्वतंत्र वायर टाकून सदर वायर घरच्या मुख्य वायरला जोडण्यात आला आहे. यामुळे घरात वापरण्यात आलेल्या विजेची विद्युत मीटरमध्ये नोंद होत नाही. वीज चोरी एकदम लक्षात येऊ नये यासाठी काही दिवस हा वायर काढून टाकला जातो. त्यामुळे काही युनिटची नोंद घेतल्या जाते.
वीज चोरट्यांचा हा नवीन फंडा बहुतांश वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहित आहे. हे प्रकार विजेचा जास्त वापर करणाऱ्या नागरिकांकडून किंवा गृह उद्योगांमध्ये सर्रास सुरू आहेत. यामुळे वीज वितरण कंपनीचे महिन्याकाठी कोट्यवधी रूपयाचे नुकसान होत आहे. याकडे वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे. (वार्ताहर)