नक्षलवाद्यांनी केली इसमाची गोळ्या झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 13:25 IST2021-09-19T13:23:38+5:302021-09-19T13:25:19+5:30

मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी, सुरजागड लोहखाणीला अप्रत्यक्ष विरोध

naxals shot and killed one farmer in gadchiroli | नक्षलवाद्यांनी केली इसमाची गोळ्या झाडून हत्या

नक्षलवाद्यांनी केली इसमाची गोळ्या झाडून हत्या

एटापल्ली (गडचिरोली) : हेडरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सुरजागड गावातील सोमाजी चैतु सडमेक (५५) या शेतकऱ्याची नक्षल्यांनी गोळी झाडून शनिवारी रात्री हत्या केली. मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही सापडली असून त्यात जल, जंगल, जमिनीवर लोकांचा हक्क असल्याचे सांगत सुरजागड लोहखाणीला असलेला विरोध अप्रत्यक्षपणे प्रकट केला आहे.

पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहीतीनुसार, तीन नक्षल्यांनी रात्री ११ वाजताच्या सुमारात सोमाजी यांच्या घरी जावुन त्यांला झोपेतून उठविले. यावेळी ते आणि त्यांची पत्नी असे दोघेच घरी होते. सोमजीला सोबत नेताना बाहेरुन दाराची साखळी लावुन त्यांच्या पत्नीला घरात बंद केले. सोमजीचे हात बांधून गावाबाहेर घेवुन गेले. त्यानंतर त्यांची गोळी घालुन हत्या केली आणि मृतदेह एटापल्ली ते गट्टा या मुख्य मार्गावर टाकला. मृतदेहाजवळ नक्षल्यांनी एक चिठ्ठी सोडली. त्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दलाल नेत्यांना हाकलून लावा असेही म्हटले. ही छोटेखानी चिठ्ठी मराठीत आहे हे विशेष.

जून महिन्यात नक्षल्यांनी टाकलेल्या पत्रकात अनेकांच्या नावाचा उल्लेख केला होता. त्यात सोमजीचेही नाव होते. त्यानंतर पोलिसांनी सोमजीला सूचनापत्र देऊन सावध केले होते. सुरजागड लोह प्रकल्पाला नक्षल्यांचा विरोध आहे. अशातच ही हत्या झाल्याने चर्चेला उधान आले आहे. मृत सोमजी हे सुरजागड येथील रहिवासी असले तरी खाणीच्या कामावर जात नव्हते. पोलिसांनी ही हत्या सुरजागडसंबंधी असण्याची शक्यता नाकारली आहे. सोमजी यांना एक अविवाहीत मुलगी असून घटनेच्या वेळी ती बाहेरगावी होती.
 

Web Title: naxals shot and killed one farmer in gadchiroli