ढोल, नगाऱ्याच्या तालावर नक्षलवादी थिरकले...; VIDEO व्हायरल, पोलिस अलर्ट
By संजय तिपाले | Updated: September 7, 2023 19:51 IST2023-09-07T19:51:18+5:302023-09-07T19:51:53+5:30
छत्तीसगडच्या सीमावर्ती जंगलातील हा व्हिडिओ असल्याने गडचिरोली पोलिस देखील अलर्ट झाले आहेत.

ढोल, नगाऱ्याच्या तालावर नक्षलवादी थिरकले...; VIDEO व्हायरल, पोलिस अलर्ट
गडचिरोली : घनदाट जंगलात ढोल, नगाऱ्याच्या तालावर नक्षलवादी थिरकतानाचा एक व्हिडिओ ७ सप्टेंबरला समाजमाध्यमात व्हायरल झाला. यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, नक्षल्यांचा बालेकिल्ला असलेल्या बस्तर (जि.छत्तीसगड) येथील जंगलातील हा व्हिडिओ असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बस्तर हा भामरागडला चिकटून असलेला जिल्हा आहे. छत्तीसगडच्या सीमावर्ती जंगलातील हा व्हिडिओ असल्याने गडचिरोली पोलिस देखील अलर्ट झाले आहेत.
काही महिन्यांपूर्वी बस्तरमध्ये नक्षल्यांनी नवीन दलम सदस्य भरती केले. यात काही युवतींचाही समावेश आहे. नक्षल चळवळीत जोडल्या गेलेले नवे सदस्य ढोल व नगाऱ्याच्या दणदणाटात नृत्य करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, या व्हिडिओची पोलिसांनी पडताळणी केली असून त्यात एकही व्यक्ती गडचिरोलीशी संबंधित नाही. मात्र, पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.
नक्षल्यांच्या बालेकिल्ल्यातील व्हिडिओ -
तीन दशकांपासून गडचिरोली जिल्हा नक्षल्यांच्या रक्तरंजित कारवायांनी होरपळून निघाला. मात्र, आता नक्षलवादाला पायबंद घालण्यात पोलिसांना बऱ्यापैकी यश आले आहे. तेलंगण आणि छत्तीसगड सीमा लागून असल्याने या भागात नक्षली कायम सक्रिय असतात. मात्र, गडचिरोली पोलिसांनी आक्रमकपणे अभियान राबविल्यामुळे नक्षल्यांचे मनसुबे धुळीस मिसळले आहेत.