नक्षल्यांचा तळ उध्दवस्थ, चकमकीत एका जवानाला हौतात्म्य; छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलातील घटना
By संजय तिपाले | Updated: February 11, 2025 22:35 IST2025-02-11T22:34:37+5:302025-02-11T22:35:29+5:30
छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलातील घटना, हेलिकॉप्टरने उपचारासाठी नेताना सोडला श्वास

नक्षल्यांचा तळ उध्दवस्थ, चकमकीत एका जवानाला हौतात्म्य; छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगलातील घटना
गडचिरोली : छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी नजीकच्या दिरंगी व फुलणार या गावालगतच्या जंगलात ११ फेब्रुवारीला पोलिस व माओवाद्यांत जोरदार चकमक झाली. यावेळी पोलिसांनी नक्षल्यांचा तळ उध्वस्थ केला. मात्र, चकमकीदरम्यान जिल्हा पोलिस दलाच्या सी- ६० या विशेष पथकातील एक जवान शहीद झाला. महेश कवडू नागुलवार (३९,रा. अनखोडा ता. चामोर्शी) असे हौतात्म्य आलेल्या जवानाचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, भामरागड तालुक्यातील शेवटच्या टोकावरील छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या भामरागड तालुक्यातील दिरंगी आणि फुलणार या गावातील जंगल परिसरात माओवाद्यांनी तळ ठोकला होता. याबाबत माहिती प्राप्त होताच गडचिरोली पोलिसांचे नक्षलविरोधी सी- ६० चे १८ पथके आणि सीआरपीएफच्या दोन पथकांच्या जवानांनी १० जानेवारी रोजी या परिसरात नक्षलविरोधी मोहीम राबवली होती. ११ जानेवारी रोजी या परिसराला जवानांनी घेराव टाकला असता घनदाट जंगलात दडून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला.
यावेळी जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. चकमकीदरम्यान गडचिरोली सी- ६० पथकाचा जवान महेश नागुलवार यांच्या छातीला गोळी लागली. हेलिकॉप्टरने उपाचारासाठी नेताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. चकमकीच्यावेळी २५ ते ३० नक्षलवादी तेेथे उपास्थित असल्याची माहिती असून यात जहाल नक्षल नेता रघुसह काही मोठे कमांडर होते. चकमकस्थळ घनदाट जंगलाने वेढलेला असल्याने जवानांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नक्षलवाद्यांशी लढा दिला. गेल्या चार वर्षात गडचिरोली पोलिसांनी केलेल्या आक्रमक कारवायांमुळे माओवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. चार वर्षांत एकही जवान शहीद झालेला नव्हता. महेश नागुलवार यांची प्राणज्योत मालवल्याची वार्ता कळताच पोलिस दल हळहळले.
दोन चिमुकल्या पितृप्रेमाला पारख्या
महेश नागुलवार हे २०१० मध्ये पोलिस दलात भरती झाले होते. त्यांच्या पत्नी राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून नोकरीला आहेत. त्यांना आदवी (११) व आश्वी (५) अशा दोन मुली आहेत. महेश नागुलवार यांच्या निधनामुळे दोन चिमुकल्या पितृप्रेमाला पारख्या झाल्या आहेत.