भामरागडमध्ये पुन्हा नक्षल्यांचा थरार, वृद्धाचा गळा दाबून खून; दोन महिन्यांतील दुसरी घटना

By संजय तिपाले | Updated: March 30, 2025 12:05 IST2025-03-30T12:04:42+5:302025-03-30T12:05:04+5:30

दोन महिन्यांतील दुसरी घटना : मध्यरात्री घरातून बाहेर नेऊन संपविले 

Naxalites again terrorize Bhamragad, strangling an elderly man; Second incident in two months | भामरागडमध्ये पुन्हा नक्षल्यांचा थरार, वृद्धाचा गळा दाबून खून; दोन महिन्यांतील दुसरी घटना

मृत - पुसू पुंगाटी

 गडचिरोली : भामरागड तालुक्यातील जुवी या अतिदुर्गम गावात एका निरपराध वृद्धाची २९ मार्च रोजी मध्यरात्री नक्षल्यांनी एका निरपराध वृद्धाची गळा दाबून हत्या केली. ३० मार्च रोजी गुढीपाडव्याच्या सकाळी ही घटना उजेडात आली. दोन महिन्यांत नक्षल्यांनी दोन हत्या केल्याने भामरागड हादरले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, भामरागडच्या जुवी गावात हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव पुसू गिबा पुंगाटी (६०) आहे. ते शेती व्यवसाय करीत. कुटुंबासह ते २९ रोजी रात्री घरी होते. मध्यरात्रीच्या सुमारास चार नक्षलवाद्यांनी घराच्या दरवाजावर थाप मारली. कुटुंबियांनी दरवाजा उघडला असता पुसू यांच्याकडे काम आहे असे सांगून त्यांना ते सोबत घेऊन गेले. गावालगतच्या जंगलात पुसू पुंगाटी यांची गळा दाबून हत्या करण्यात आली. ३० रोजी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी नक्षल पत्रक किंवा पोस्टर आढळून आले नाही. त्यांचा मृतदेह भामरागड येथील रुग्णालयात आणण्यात आला आहे. पोलिसांचा खबरी असल्याचा संशयातून ही हत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी ते खबरी असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. परिसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

यापूर्वी माजी सभापतींचा खून 
१ फेब्रुवारीला भामरागडचे माजी पंचायत समिती सभापती सुखराम मडावी (रा. कियर) यांची हत्या करून नक्षल्यांनी मृतदेहाजवळ पत्रक टाकले होते. दोन महिन्यांत दुसरा खून झाल्याने या भागात नक्षली सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

पोलिसांनी कोंडी केली म्हणून... 
छत्तीसगड सीमेवरून गडचिरोलीत प्रवेश करणाऱ्या माओवाद्यांची पोलिसांनी सीमावर्ती भागात पोलिस ठाणे सुरू करून कोंडी केली आहे. चालू वर्षी भामरागड तालुक्यात छत्तीसगड सीमेवर पेनगुंडा, नेलगुंडा व कवंडे येथे पोलिस ठाणे सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे माओवादी बिथरले आहेत.

Web Title: Naxalites again terrorize Bhamragad, strangling an elderly man; Second incident in two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.