नक्षल कमांडर 'भास्कर'ला कंठस्नान, तीन दिवसांत सात माओवादी ठार

By संजय तिपाले | Updated: June 7, 2025 17:40 IST2025-06-07T17:39:59+5:302025-06-07T17:40:44+5:30

छत्तीसगड सीमेवर चकमक : पाच जणांची ओळख पटेना

Naxal commander 'Bhaskar' killed, seven Maoists killed in three days | नक्षल कमांडर 'भास्कर'ला कंठस्नान, तीन दिवसांत सात माओवादी ठार

Naxal commander 'Bhaskar' killed, seven Maoists killed in three days

संजय तिपाले
गडचिरोली :  छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये ५ जूनपासून चकमक सुरु आहे. तीन दिवसांत सात माओवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. पहिल्याच दिवशी सहा राज्यांतील वाँटेड व तीन कोटींचे बक्षीस असलेला केंद्रीय समिती सदस्य नरसिंहचलम उर्फ ​​सुधाकर उर्फ ​​गौतम (६९) याचा खात्मा करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी तेलंगणा राज्य समिती सदस्य व नक्षल कमांडर भास्कर उर्फ ​​मैलारापू अडेल्लू (४५) याच्यासह दोन महिला माओवाद्यांना तर ७ जून रोजी आणखी तीन माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

भास्करच्या डोक्यावर ४५ लाख रुपयांचे बक्षीस होते. तो चळवळीत टॉप कमांडर म्हणून परिचित होता. नक्षलवादी संघटनेच्या धोरणात्मक कारवायांमध्ये त्याचा सहभाग असे. भास्कर अनेक मोठ्या घटनांचा सूत्रधार असल्याने सुरक्षा दलांसाठी हे मोठे यश मानले जात आहे.  छत्तीसगडमधील बिजापूरच्या घनदाट जंगलात असलेल्या इंद्रावती राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात  सुरु असलेल्या नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांनी आतापर्यंत सात जणांना निशाणा बनवले.  ६ रोजी रात्री उशिरा भास्करची ओळख पटली. तथापि, अद्याप पाच जणांची ओळख पटलेली नाही. सुरक्षा दलांच्या पथकांनी परिसराला सर्व बाजूंनी वेढा घातला असून शोध मोहीम अजूनही सुरू आहे.  बिजापूर पोलिस व केंद्रीय सुरक्षा बलाचे जवानांकडून नक्षलविरोधी मोहीम अजून गतिमान करण्यात आली आहे.  
 

अत्याधुनिक शस्त्रे जप्त

चकमकीनंतर सैनिकांनी घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त केले. यामध्ये एके-४७, इन्सास रायफल्स, देशी बनावटीचे पिस्तूल, ग्रेनेड, वायरलेस सेट आणि नक्षल साहित्यांचा समावेश आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख आणि गुन्हेगारी रेकॉर्डची पुष्टी करण्यासाठी फॉरेन्सिक आणि गुप्तचर पथके घटनास्थळी पोहोचली आहेत.
 
तीन दिवसांत काय घडले ?
५ जून :केंद्रीय समिती सदस्य   सुधाकर उर्फ ​​गौतमचा खात्मा
६ जून: तेलंगणा राज्य समिती सदस्य भास्करला कंठस्नान, दोन महिला माओवादी सदस्यांचे मृतदेह सापडले
७ जून :   तीन पुरुष नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश
 

जवानांना सर्पदंश, मधमाशांचा चावा
 
या मोहिमेदरम्यान   सुरक्षा दलाच्या काही कर्मचाऱ्यांना साप चावणे, मधमाशीचा दंश झाला. डिहायड्रेशन व मोहिमेदरम्यान देखील काही जवान जखमी झाले. त्या सर्वांना योग्य ते उपचार सुरु असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. कठीण परिस्थितीवर मात करुन जवान माओवाद्यांविरुध्द लढत आहेत.
 

Web Title: Naxal commander 'Bhaskar' killed, seven Maoists killed in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.