नक्षलग्रस्त भागात : पोलीस दलात काम करण्यासाठी तरूणी सरसावल्या
By Admin | Updated: June 26, 2014 23:12 IST2014-06-26T23:12:02+5:302014-06-26T23:12:02+5:30
गडचिरोली हा महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा आहे. या जिल्ह्यात पोलीस दलाचे काम हे अत्यंत जोखमीचे काम आहे. जंगलात अहोरात्र फिरून नक्षलवाद्यांशी दोन हात करण्याची हिंमत या पोलीस

नक्षलग्रस्त भागात : पोलीस दलात काम करण्यासाठी तरूणी सरसावल्या
गडचिरोली : गडचिरोली हा महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा आहे. या जिल्ह्यात पोलीस दलाचे काम हे अत्यंत जोखमीचे काम आहे. जंगलात अहोरात्र फिरून नक्षलवाद्यांशी दोन हात करण्याची हिंमत या पोलीस दलात काम करणाऱ्या प्रत्येकाला ठेवावी लागते. गडचिरोली जिल्ह्यातील तरूण मुली सध्या पोलीस दलातील नोकरीकडे आकृष्ठ झाल्या आहेत. महिलांसाठी एकूण २५ जागा गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस भरतीत आहे. या भरतीसाठी शेकडो महिला उमेदवार यंदा तयारीनिशी उतरल्या होत्या. ही अत्यंत सकारात्मक बाब असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम व अतिदुर्गम भागात पोलीस ठाणे आहेत. पोलिसांवर नेहमी नक्षल विरोधी मोहिमा आखण्याचे काम राहते. या कामाचा सातत्याने दबाव पोलीस दलावर राहतो. साधारणत: पुरूष मंडळी पोलीस दलातील नोकरीला प्राधान्य देतात. परंतु गेल्या काही वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील मुलीही पोलीस दलाच्या नोकरीकडे आकृष्ठ झाल्या आहेत. यंदाच्या गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत २५ जागा या महिलांसाठी राखीव होत्या. यामध्ये अनुसूचित जाती १०, अनुसूचित जमाती दोन, विमुक्त जाती अ-१, भटक्या जमाती ब- २, भटक्या जमाती ड - १ विशेष मागास प्रवर्ग १, इतर मागास वर्ग १ व खुल्या प्रवर्गासाठी ७ जागा होत्या. या जागांकरीता हजाराच्या वर महिला उमेदवार दाखल झाले होते. कठोर असलेली शारीरिक क्षमता चाचणी पार केल्यानंतर लेखी परीक्षेसाठीही महिला उमेदवारांची मोठी गर्दी यंदा होती. (जिल्हा प्रतिनिधी)