'बनावट कट रचून माझ्या पतीची केली हत्या' शरण आलेल्या माओवादी नेत्यांवर गंभीर आरोप
By संजय तिपाले | Updated: October 31, 2025 16:10 IST2025-10-31T16:07:53+5:302025-10-31T16:10:45+5:30
Gadchiroli : छत्तीसगडच्या जगदलपूर येथे ३१ ऑक्टोबर रोजी आपल्या पतीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेल्या शांतीप्रियाने माध्यमांशी संवाद साधताना थरकाप उडवणारे आरोप केले.

'My husband was murdered by a fake conspiracy' Serious allegations against surrendered Maoist leaders
गडचिरोली : छत्तीसगडमधील सप्टेंबर महिन्यात झालेल्या चकमकीत ठार झालेल्या जहाल नक्षल नेता आणि सेंट्रल कमिटी सदस्य कट्टा रामचंद्र रेड्डी उर्फ राजू दादा याच्या मृत्यूने नक्षली चळवळीत जबरदस्त धक्के दिले आहेत. या घटनेनंतर आता राजू दादाची पत्नी शांतीप्रिया हिने केलेल्या सनसनाटी खुलाशाने संपूर्ण माओवादी संघटना हादरली आहे. नुकतेच आत्मसमर्पण केलेल्या काही वरिष्ठ नेत्यांनीच माझ्या पतीची हत्या केली, असा गंभीर आरोप तिने केला आहे.
 
छत्तीसगडच्या जगदलपूर येथे  ३१ ऑक्टोबर  रोजी आपल्या पतीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेल्या शांतीप्रियाने माध्यमांशी संवाद साधताना थरकाप उडवणारे आरोप केले. ती म्हणाली,  माझ्या पतीला आणि कोसा दादाला २२ सप्टेंबर रोजी जिवंत पकडण्यात आले होते. त्यांच्यावर अमानुष छळ करण्यात आला आणि नंतर बनावट चकमकीत हत्या केली. हा सगळा कट संघटनेतील फितुरांनी रचला, असा दावा तिने केला.
गद्दारांना सरकार ब्रँड अँबेसेडर बनवतंय !
आत्मसमर्पित माओवादी नेत्यांवर निशाणा साधत शांतीप्रिया पुढे म्हणाली, हेच गद्दार आज शरणागती पत्करून सरकारकडून सन्मान मिळवत आहेत. सरकार त्यांना ‘ब्रँड अँबेसेडर’ बनवतंय, आणि आम्हाला मात्र न्यायासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागत आहेत. आमचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वासच ढळला आहे. काही नेत्यांना शरण जाऊन ऐशोआरामात जीवन जगायचे होते, म्हणूनच त्यांनी माझ्या पतीचा बळी दिला, असा दावा तिने केला.
भूपती, रुपेश उत्तर देणार का?
राजू दादाच्या कुटुंबीयांनी यापूर्वीच या चकमकीला ‘बनावट’ ठरवत मृतदेह ताब्यात घेण्यासाठी न्यायालयीन लढा दिला होता. या आरोपांनंतर नक्षली चळवळीतील अंतर्गत गटबाजी, संशय आणि अविश्वास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शांतीप्रियाच्या या थेट आरोपांमुळे शरणागती पत्करलेल्या या नेत्यांवर संशयाचे सावट गडद झाले आहे. नुकतेच आत्मसमर्पण केलेला पॉलिट ब्युरो सदस्य भूपती उर्फ सोनू दादा आणि दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा कमांडर रूपेश उर्फ सतीश हे आता या आरोपांना काय उत्तर देतात याकडे संपूर्ण सुरक्षा यंत्रणांचे लक्ष लागले आहे.