म्युकोपॉलीसॅक्रायडोसीस आजाराचा संशयित रूग्ण
By Admin | Updated: August 14, 2014 23:43 IST2014-08-14T23:43:52+5:302014-08-14T23:43:52+5:30
म्युकोपॉलीसॅक्रायडोसीस हा अत्यंत दुर्मिळ आजार असून या आजाराचा धानोरा तालुक्यातील मरमा या गावी संशयीत रूग्ण आढळला आहे. सदर आजार ५ लाख नागरिकांमध्ये एकाला आढळून येते.

म्युकोपॉलीसॅक्रायडोसीस आजाराचा संशयित रूग्ण
गडचिरोली : म्युकोपॉलीसॅक्रायडोसीस हा अत्यंत दुर्मिळ आजार असून या आजाराचा धानोरा तालुक्यातील मरमा या गावी संशयीत रूग्ण आढळला आहे. सदर आजार ५ लाख नागरिकांमध्ये एकाला आढळून येते. रूग्णाच्या शरीरात निर्माण झालेली शर्करा खर्च होत नसल्याने ती पेशीमध्ये जमा होते व त्यामुळे सदर अवयव निकामी होतो. मरमा येथील ३ वर्षीय मुलीचे डोळे निकामी झाले आहेत. या आजाराच्या रूग्णाला बरा करण्यासाठी पुष्कळ खर्च येत असल्याने शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी सोसायटी फॉर ओरल कॅन्सर अॅन्ड हेल्थचे डॉ. नंदू मेश्राम यांनी दिली आहे.
मरमा येथील अंम्रिका मंगलसिंग उसेंडी ही सोच या संस्थेच्या वैद्यकीय तपासणी शिबिरामध्ये आढळून आली. ती जन्मत:च अंध आहे. डोळ्यांच्या तपासणीकरिता नागपूर येथे नेण्यात आले असता, बालरोगतज्ज्ञांनी तिला म्युकोपॉलीसॅक्रायडोसीस हा आजार झाला असल्याचा संशय व्यक्त केला. या आजाराची तपासणी व उपचार नवी दिल्ली येथील एम्स या रूग्णालयातच होते. त्यामुळे या मुलीला एम्स येथे भरती करण्यात आले होते. रूग्णालयामध्ये डोळ्यांची तपासणी करून शस्त्रक्रिया त्वरित करण्याचा सल्ला दिला. या आजारासाठी बऱ्याच तपासण्या कराव्या लागणार असून त्यासाठी लागणारा खर्च लाखांच्या घरात आहे. १७ आॅगस्ट रोजी तिला एम्स रूग्णालयात भरती केले जाणार आहे. मात्र तिच्या वडीलाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने नागरिकांनी व शासनाने मदत करावी असे आवाहन डॉ. मेश्राम यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)