दुर्गम भागातील शिक्षकांचे बदल्यांसाठी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2017 01:37 IST2017-05-10T01:37:29+5:302017-05-10T01:37:29+5:30
जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया यावर्षी राबविण्यात यावी,

दुर्गम भागातील शिक्षकांचे बदल्यांसाठी आंदोलन
जिल्हा परिषदेसमोर धरणे : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर; बदल्यासंदर्भात केली चर्चा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषदेंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया यावर्षी राबविण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी दुर्गम भागातील अन्यायग्रस्त शिक्षक संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात दुर्गम भागात कार्यरत असलेले शेकडो शिक्षक सहभागी झाले होते.
जिल्हा परिषदेमध्ये दरवर्षी होणाऱ्या शिक्षकांच्या बदल्यांमध्ये घोळ केला जात असल्याने दुर्गम व नक्षलग्रस्त भागात मागील १० ते १५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या शांत भागात बदल्या होत नाही. त्यामुळे या शिक्षकांवर अन्याय केला जात आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शिक्षकांनी आंदोलन केले. बदली प्रक्रिया राबवावी, या मुख्य मागणीसह सर्वसाधारण व अवघड क्षेत्र निहाय सेवा ज्येष्ठता यादी प्रकाशित करावी, सेवेत असताना उच्च शिक्षण घेतलेल्या शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेची चौकशी करावी, सिरोंचा, एटापल्ली, अहेरी, भामरागड, धानोरा, कोरची व कुरखेडा या सहा तालुक्यातील सर्वच गावांचा अवघड क्षेत्रात समावेश करावा, आदी मागण्यांचा समावेश आहे. आंदोलनानंतर सीईओ यांना निवेदन दिले आहे.
बदल्यांवर प्रश्नचिन्ह
एक महिन्यापूर्वी शिक्षक समायोजनाची प्रक्रिया राबविण्यात आली होती. या समायोजन प्रक्रियेविरोधात काही शिक्षकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने समायोजन प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या बदल्या होणार नाही, अशी शक्यता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.