मिनी मंत्रालयाचा आज फैसला
By Admin | Updated: February 23, 2017 01:17 IST2017-02-23T01:17:11+5:302017-02-23T01:17:11+5:30
गडचिरोली तालुक्याची मतमोजणी जिल्हा क्रीडा प्रबोधिनीच्या सभागृहात राहणार आहे.

मिनी मंत्रालयाचा आज फैसला
मतमोजणीची तयारी पूर्ण : सकाळी १० वाजतापासून मतमोजणी, १२ तालुक्यांचे निकाल २ वाजेपर्यंत येणार
गडचिरोली तालुक्याची मतमोजणी जिल्हा क्रीडा प्रबोधिनीच्या सभागृहात राहणार आहे. तेथे ११ टेबल राहणार असून ११ पर्यवेक्षण अधिकारी व त्यांचे ११ सहायक राहतील. मतमोजणीच्या कामासाठी जवळजवळ ८० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. मतमोजणीच्या २० फेऱ्या होतील. प्रत्येक फेरीला साधारणत: २० मिनीटे लागेल. दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व निकाल अपेक्षित आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष खांडरे यांनी दिली आहे.
धानोरा तालुक्यात मतमोजणी तहसील कार्यालयात होणार असून आठ टेबलवर ३५ कर्मचारी या कामासाठी तैनात करण्यात आले आहे. दुपारी २ वाजेपर्यंत निकाल पूर्ण होतील, अशी माहिती तहसीलदार गणवीर यांनी दिली आहे.
देसाईगंज तालुका मुख्यालयात जिल्हा परिषदेच्या ३ व पंचायत समितीच्या ६ जागांची मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. तहसील कार्यालयात १३ टेबल या कामासाठी राहतील. ६५ कर्मचारी मतमोजणी कामासाठी नियुक्त करण्यात आले असून जिल्हा परिषदेचे ६ व पंचायत समितीचे ६ असे १२ राऊंड मतमोजणीचे होईल. दुपारी २ वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती नायब तहसीलदार उमेश अंबादे यांनी दिली आहे.
चामोर्शी तालुक्यात ९ जिल्हा परिषद १८ पंचायत समिती गणाच्या मतमोजणीसाठी १२ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीच्या कामासाठी महसूल खात्यातील ११० कर्मचारी कार्यरत राहणार आहे. मतदानाच्या १८ फेऱ्या पूर्ण केल्या जातील. महसूल मंडळ कार्यालय गडचिरोली मार्ग चामोर्शी येथे मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी जी. एम. तळपादे यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार अरूण येरचे, नायब तहसीलदार एस. आर. तनगुलकर काम पाहतील.
आरमोरी येथील मतमोजणी शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र इमारतीत होणार आहे. मतमोजणी कामासाठी ८ टेबल राहणार आहे. ८ मतमोजणी पर्यवेक्षक व ८ सहायक यांच्यासह ५० कर्मचारी येथे नियुक्त करण्यात आले आहे. एकूण ९२ मतदान केंद्राकरिता १२ फेऱ्या होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दामोधर नान्हे यांच्यासह सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मनोहर वलथरे या कामावर लक्ष ठेवतील.
मुलचेरा येथील तहसील कार्यालयात सकाळी १० वाजतापासून मतमोजणीच्या कामास प्रारंभ होणार आहे. मतमोजणीच्या कामासाठी येथे ९ टेबलची व्यवस्था राहणार असून ६ फेऱ्या होतील. मतमोजणीच्या कामासाठी जवळपास ५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तालुक्यातील संपूर्ण जि. प. क्षेत्र व पं. स. गणाचा निकाल दुपारी १ वाजेपर्यंत जाहीर होईल. सदर मतमोजणीचे काम निवडणूक निर्णय अधिकारी तथा जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अनिरूद्ध कांबळे, नायब तहसीलदार समशेर पठाण लक्ष ठेवून पार पाडणार आहेत.
कुरखेडा तालुक्यातील जि. प., पं. स. निवडणुकीची मतमोजणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. मतमोजणीसाठी या ठिकाणी १७ टेबलची व्यवस्था करण्यात आली असून ६० कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या १५ फेऱ्या होणार आहेत. मतमोजणी कामावर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शुभांगी आंदळे व सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अजय चरडे नजर ठेवून आहेत. येथे जि. प. चे ५ क्षेत्र व १० पं. स. गणासाठी मतमोजणी होणार आहे.
कोरची येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी १० वाजतापासून मतमोजणीला सुुरुवात होणार आहे. मतमोजणीच्या कामासाठी येथे १० टेबलची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक टेबलवर २ कर्मचारी व १० अतिरिक्त असे एकूण ३० कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तालुक्यातील ४० मतदान केंद्रावरील मतमोजणीसाठी ८ फेऱ्या होतील. मतमोजणीच्या कामावर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एम. एच. टोनगावकर, सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विजय बोरूडे लक्ष ठेवून आहेत.
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या ५१ व पंचायत समितीच्या १०२ जागांची मतमोजणी १२ तालुका मुख्यालयात सकाळी १० वाजतापासून गुरूवारी होणार आहे. यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून दुपारी २ वाजेपर्यंत मतमोजणीचा सर्व कौल येईल, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.