गडचिरोलीतील नळांना लागणार मीटर
By Admin | Updated: January 28, 2015 23:33 IST2015-01-28T23:33:52+5:302015-01-28T23:33:52+5:30
पाण्याचा अपव्यय टाळण्याबरोबरच शहरातील नागरिकांना पाणी बचतीची सवय लागावी या उद्देशाने गडचिरोली नगर परिषदेने ६ हजार ७७१ नळांना मीटर लावण्याचा निर्णय घेतला असून याची

गडचिरोलीतील नळांना लागणार मीटर
दिगांबर जवादे - गडचिरोली
पाण्याचा अपव्यय टाळण्याबरोबरच शहरातील नागरिकांना पाणी बचतीची सवय लागावी या उद्देशाने गडचिरोली नगर परिषदेने ६ हजार ७७१ नळांना मीटर लावण्याचा निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी दोन महिन्यात केली जाणार आहे. मीटरमुळे नागरिकांना आता पाण्याच्या वापरानुसार पैसे मोजावे लागणार आहेत.
गडचिरोली शहरात सद्यस्थितीत ६ हजार १२१ नळ जोडण्या आहेत. शहरात ७ पाण्याच्या टाक्या आहेत. या टाकीद्वारे प्रत्येक घरी नळाचे पाणी पोहोचविले जाते. गडचिरोली शहराला नजीकच्या वैनगंगा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. वैनगंगा नदी मोठी असून या नदीला बारमाही पाणी राहते. त्याचबरोबर नदीच्या वरच्या भागात एकही कारखाना नसल्याने सदर नदीचे पाणी शुद्ध राहते. त्यामुळे गडचिरोली शहरवासीयांना कधीच पाण्याचा तुटवडा भासत नाही. सकाळी व सायंकाळी अपवाद वगळता प्रत्येक वार्डात मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो.
नदीतून पाणी उचलून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत व जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्याच्या टाकीमध्ये पाणी भरावे लागते. यासाठी महिन्याला लाखो रूपयांचे विद्युत बिल येते. त्याचबरोबर पाणी शुद्ध करण्यासाठीही लाखो रूपये खर्च केले जातात. नगर परिषदेने पाण्याचा खर्च कमी व्हावा, नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा व भविष्यात भेडसावणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने पाण्याची बचत करावी, यासाठी प्रत्येक नळाला तोट्या लावाव्या, याबाबत जनजागृती केली जात आहे. त्याचबरोबर वेळप्रसंगी तोट्या व न लावणाऱ्या नळधारकांवर दंडसुद्धा आकारला जातो. मात्र नगर परिषदेची ही सूचना नागरिक वेशीवर टांगत आहेत. अपवाद वगळता कुणीच नळाला तोट्या लावत नाही. त्यामुळे पाण्याचा फार मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.
नागरिकांना पाणी बचतीची सवय लावण्याच्या उद्देशाने आता नगर परिषदेने प्रत्येक नळाला मीटर लावण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक मीटरसाठी २ हजार ५१८ रूपये खर्च येणार आहेत. शहरात सध्य:स्थितीत ६ हजार १२१ नळ जोडण्या आहेत. भविष्यात यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने ६ हजार ७७१ नळांना मीटर लावण्याचे नियोजन केले आहे. यासाठी जवळपास १ कोटी ७० हजार रूपये खर्च येणार आहे. एवढा मोठा निधी नगर परिषदेकडे उपलब्ध नाही. त्यामुळे सदर निधी राज्यशासनाने उपलब्ध करून द्यावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सदर प्रस्ताव मंजूर होताच शहरातील नळांना मीटर लावण्याचे काम सुरू केले जाणार आहे. यासाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाने दिली आहे.
मोठ-मोठ्या शहरांमधील नगर परिषद प्रशासनाने यापूर्वीच नळांना मीटर लावून पाण्याच्या अपव्ययावर प्रतिबंध घातला आहे. मीटरच्या माध्यमातून गडचिरोलीकरांनाही पाणी बचतीची सवय लावून घ्यावी, लागणार आहे. अन्यथा पाण्याचे बिल विद्युत बिलापेक्षाही अधिक येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाण्याचा अपव्यय कमी झाल्यामुळे ज्या वार्डांमध्ये पाणी पोहोचत नाही, अशा वार्डांमध्ये पाणी पोहोचण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर नळाचे पाणी जास्त वेळ उपलब्ध राहणार असल्याने नळापुढे नागरिकांच्या रांगा कमी होण्यासही मदत होईल. अनेक नागरिकांनी नगर परिषदेच्या या निर्णयाचे स्वागत केले असून मीटर तत्काळ लावावे, अशी मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)