वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले धरणे आंदोलन
By Admin | Updated: July 2, 2014 23:18 IST2014-07-02T23:18:17+5:302014-07-02T23:18:17+5:30
राजपत्रित वैद्यकीय अधिकारी मंगळवारपासून आंदोलनावर गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवा कोलमडली असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मॅग्मो या

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले धरणे आंदोलन
गडचिरोली : राजपत्रित वैद्यकीय अधिकारी मंगळवारपासून आंदोलनावर गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवा कोलमडली असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मॅग्मो या संघटनेने दिला आहे. आज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन केले.
या आंदोलनात जिल्ह्यातील १५० वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे सामान्य रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, प्राथमिक आरोग्य पथक यांच्यातील काम पूर्णत: बंद झाले आहे. आज धरणे आंदोलनात राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना मॅग्मोचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय आकोलकर, डॉ. सुनिल मडावी, मॅग्मो संघटनेचे राज्य सरचिटणीस डॉ. प्रशांत आखाडे, डॉ. सचिन हेमके, डॉ. प्रशांत कारेकर, डॉ. रवींद्र करपे, डॉ. रचना नागदेवे, डॉ. अस्मिता देवगडे, डॉ. किशोर ताराम, डॉ. मोरे, डॉ. अमित साळवे, डॉ. बिधान देवारी, डॉ. हिचामी, डॉ. टेंभूर्णे, डॉ. ठाकरे यांच्यासह उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, जिल्हा सामान्य रूग्णालय, आरोग्य पथकाचे वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी शासनाने मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेने दिला आहे. मुंबई येथे आयोजित आंदोलनात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी गुरूवारी मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती डॉ. प्रशांत आखाडे यांनी लोकमतशी बोलतांना दिली. जिल्ह्यासह राज्यातील वैद्यकीय अधिकारी ११ जुलै रोजी आपले सामुहिक राजीनामे राज्य सरकारकडे सादर करणार आहे, अशीही माहिती आंदोलकांनी दिली आहे. सन २००९-१० मध्ये सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकारी यांना पूर्वलक्ष लाभ मिळण्यात यावा, अस्थायी जवळपास ७८९ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी गट- ब व अस्थायी जवळपास ३२ बीडीएस वैद्यकीय अधिकारी गट - ब यांचे सेवा समावेशन करण्यात यावे आदी प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.