वैद्यकीय अधिकारी आंदोलनावर
By Admin | Updated: July 1, 2014 23:30 IST2014-07-01T23:30:22+5:302014-07-01T23:30:22+5:30
राजपत्रित वैद्यकीय अधिकारी आजपासून आंदोलनावर गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवा कोलमडली असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मॅग्मो या संघटनेने दिला आहे.

वैद्यकीय अधिकारी आंदोलनावर
आरोग्य सेवा कोलमडली : आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
गडचिरोली : राजपत्रित वैद्यकीय अधिकारी आजपासून आंदोलनावर गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्यसेवा कोलमडली असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मॅग्मो या संघटनेने दिला आहे. आज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जिल्हा मुख्यालयात निदर्शने करून आपल्या मागण्यांचे निवेदन शासनाकडे सादर केले आहे.
या आंदोलनात जिल्ह्यातील १५० वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे सामान्य रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, प्राथमिक आरोग्य पथक यांच्यातील काम पूर्णत: बंद झाले आहे. बहुतांश वैद्यकीय अधिकारी मुंबई येथे आझाद मैदानावर सुरू असलेल्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी गेलेले आहेत. मागण्या मान्य न झाल्यास ११ जुलै २०१४ ला सामुहिक राजिनामे देण्याचा निर्णय वैद्यकीय अधिकारी संघटना गट अ ने घेतला आहे, अशी माहिती संघटनेच्यावतीने देण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शासनाला पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २००९-१० मध्ये सेवा समावेशन झालेल्या वैद्यकीय अधिकारी यांना पूर्वलक्ष लाभ मिळण्यात यावा, अस्थायी जवळपास ७८९ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी गट- ब व अस्थायी जवळपास ३२ बीडीएस वैद्यकीय अधिकारी गट - ब यांचे सेवा समावेशन करण्यात यावे, १ जानेवारी २००६ पासून राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांना ६ वा वेतन आयोग लागू करण्यात यावा, राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना केंद्रशासन व वैद्यकीय शिक्षण विभागाप्रमाणे उच्च वेतन मिळणेबाबत, एमबीबीएस पदव्यूत्तर, बीएएमएस पदव्यूत्तर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे खातेअंतर्गत पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावा व वैद्यकीय अधिकारी गट- अ यांची सेवा ज्येष्ठता यादी तत्काळ तयार करण्यात यावी, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कामांचे तास केंद्रशासन इतर राज्याप्रमाणे निश्चित करण्यासंदर्भात शासन निर्णयाद्वारे तयार केलेल्या गठित समितीच्या सादर झालेल्या अहवालानुसार तत्काळ उचित कार्यवाही सुरू करण्यात यावी, शासनदरबारी यापूर्वीच मान्य झालेल्या एनपीए आॅपश्नल (ऐच्छिक) करण्यात यावा व याबाबत तत्काळ कारवाई करण्यात यावी, पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी गेलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना एनपीए पुनश्च चालु करण्यात यावा, सेवा अंतर्गत पदव्यूत्तर अभ्यासक्रमासंबंधी प्रलंबित जिव्हाळ्याचे प्रश्न व सेवेतील कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दृष्टीने पदव्यूत्तर अभ्यासक्रमासंबंधी उचित तत्काळ आदर्श धोरण ठरविण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात यावी, वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनासुद्धा ३ व ६ आगाऊ वेतनवाढीचा लाभ मिळवा, राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांचे व वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय केंद्र व इतर राज्याप्रमाणे ५८ वरून ६२ करण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आहे.