पोळ्यासाठी बाजारपेठ फुलली; मात्र उलाढाल कमी
By Admin | Updated: August 23, 2014 23:58 IST2014-08-23T23:58:26+5:302014-08-23T23:58:26+5:30
शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या पोळा सणासाठी गेल्या सात-आठ दिवसांपासून शहरातील सर्व बाजारपेठ पोळा सणाच्या साहित्याने फुलली आहे. मात्र या साहित्याला पाहिजे तशी

पोळ्यासाठी बाजारपेठ फुलली; मात्र उलाढाल कमी
गडचिरोली : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या पोळा सणासाठी गेल्या सात-आठ दिवसांपासून शहरातील सर्व बाजारपेठ पोळा सणाच्या साहित्याने फुलली आहे. मात्र या साहित्याला पाहिजे तशी मागणी होत नसल्याचे अनेक व्यावसायिकांनी सांगितले आहे. यंदा जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी ५० टक्केच रोवणी झाली आहे. शेतकरी दुष्काळाच्या छायेत आहे. यामुळे पोळ्याच्या सणाची उलाढाल मंदावली असल्याचे दिसून येते.
जिल्ह्यातील शेतकरीवर्ग दरवर्षी पोळा हा सण मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा करतो. या सणानिमित्य शेतकरीवर्गातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात साहित्याची खरेदी होते. यावर्षीसुद्धा शेतकरी व इतर वर्गातील नागरिक पोळा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतील या आशेवर शहरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने साहित्याने सजविली. शहरातील अनेक दुकानासमोर पोळा सणाचे साहित्य लावलेले दिसून येते. पोळा सणासाठी बैलाला सजविण्याकरिता विविध रंग, बेगड, झुल आदींसह अन्य साहित्याची आवश्यकता असते. या साहित्याची शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी होते. इतर छोटे व्यावसायिक तसेच मजूर वर्गही पोळा सण मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करतात. मात्र यावर्षी अत्यल्प पावसामुळे रोवणीच्या हंगामात मजुरांना पुरेशी मजुरी मिळविता आली नाही. त्यामुळे मजूरवर्गसुद्धा निराश आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नजर निसर्गाकडे लागली आहे. निसर्गाची कृपादृष्टी होऊन के व्हा दमदार पाऊस बरसेल या प्रतीक्षेत शेतकरीवर्ग लागला असल्याचे दिसून येते. गेल्या १५ दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अधिक चिंताग्रस्त असल्याचे दिसून येते. यंदाचा पोळा सण दुष्काळाच्या छायेमुळे थंडाच जाणार असल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)