चार कोटींचे इनामी माओवादी ठार! झारखंडच्या जंगलात सहदेव सोरेनसह तिघांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 15:49 IST2025-09-16T15:47:13+5:302025-09-16T15:49:44+5:30

जवानांची मोठी कारवाई : तिघांवर कोट्यवधींचे इनाम

Maoist with a bounty of four crores killed! Three including Sahdev Soren killed in Jharkhand forest | चार कोटींचे इनामी माओवादी ठार! झारखंडच्या जंगलात सहदेव सोरेनसह तिघांचा खात्मा

Maoist with a bounty of four crores killed! Three including Sahdev Soren killed in Jharkhand forest

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील गोरहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंटिटरी जंगलात सोमवारी (१५ सप्टेंबर) पहाटे जवान व माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले. या तिघांवर मिळून विविध राज्यांत चार कोटींहून अधिकचे इनाम होते. मृतांत जहाल माओवादी नेता व केंद्रीय समिती सदस्य सहदेव सोरेन याचाही समावेश आहे.

कोब्रा २०९ बटालियन व स्थानिक पोलिसांनी ही संयुक्त मोहीम राबविली. अभियानादरम्यान जंगलात दडून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांवर बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. जवानांनीही त्यांना सडेतोड उत्तर दिले. चकमकीनंतर घटनास्थळावरून ए.के. ४७ रायफलसह मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. सर्व जवान सुखरूप परतले आहेत.

वर्षभरात ३० माओवाद्यांना केले ठार

झारखंडमध्ये चालू वर्षी आतापर्यंत ३० माओवाद्यांना संपविण्यात यश आले आहे. विशेष नक्षलविरोधी पथक कोब्रा, २०९ बटालियनच्या जवानांनी दोन केंद्रीय समिती सदस्य, दोन राज्य समिती सदस्य, चार झोनल समिती सदस्यांसह ३० जहाल नेत्यांना ठार केले. झारखंडमध्ये लागोपाठ आक्रमक कारवाया झाल्यामुळे माओवादी सैरावैरा झाले आहेत.

केंद्रीय समितीला आणखी एक हादरा

छत्तीसगडच्या गरियाबंद येथील चकमकीत ११ सप्टेंबर रोजी केंद्रीय समिती सदस्य मोडेम बालकृष्णा उर्फ बालन्ना मनोज याला कंठस्नान घातले होते. त्यानंतर ११ सप्टेंबरला केंद्रीय समिती सदस्य व जहाल नेता पोथुला पद्मावती उर्फ सुजाता हिने तेलंगणात आत्मसमर्पण केले. १५ सप्टेंबरला सकाळी जहाल नेता सहदेव सोरेन याचा खात्मा करण्यात यश आले. यामुळे माओवाद्यांच्या केंद्रीय समितीला मोठा झटका बसला आहे.

ठार झालेले नक्षली

सहदेव सोरेन - केंद्रीय समिती सदस्य
रघुनाथ हेम्ब्रम - स्पेशल कमिटी सदस्य
बिरसेन गंझू - झोनल कमिटी सदस्य
हे तिघेही नक्षल चळवळीतील महत्त्वाचे कॅडर होते. सहदेव सोरेन याच्या शोधासाठी पोलिसांनी मागील काही महिन्यांपासून सर्च ऑपरेशन तीव्र केले होते.

Web Title: Maoist with a bounty of four crores killed! Three including Sahdev Soren killed in Jharkhand forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.