तीन कोटींचा इनामी माओवादी ‘रामधेर’ शरण, माओवाद्यांच्या ‘एमएमसी’ला आणखी एक धक्का, छत्तीसगडच्या राजनांदगावमध्ये ११ सहकाऱ्यांसह टाकली शस्त्रे
By संजय तिपाले | Updated: December 8, 2025 13:28 IST2025-12-08T13:28:16+5:302025-12-08T13:28:36+5:30
Gadchiroli News: दोन दशकांपासून माओवादी चळवळीत सक्रिय असलेला एमएमसी झोनचा (महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड) कणा व माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य रामधेर मज्जी याने ८ डिसेंबर रोजी पहाटे छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्याच्या बकरकट्टा पोलिस ठाण्यात ११ सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले.

तीन कोटींचा इनामी माओवादी ‘रामधेर’ शरण, माओवाद्यांच्या ‘एमएमसी’ला आणखी एक धक्का, छत्तीसगडच्या राजनांदगावमध्ये ११ सहकाऱ्यांसह टाकली शस्त्रे
गडचिरोली - दोन दशकांपासून माओवादी चळवळीत सक्रिय असलेला एमएमसी झोनचा (महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड) कणा व माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य रामधेर मज्जी याने ८ डिसेंबर रोजी पहाटे छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्याच्या बकरकट्टा पोलिस ठाण्यात ११ सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण केले.
रामधेर याने स्वतःची एके–४७, तर त्याच्या सहकाऱ्यांनी इन्सास, एसएलआर .३०३ रायफल्स, आयईडी यांसारखी शस्त्रे सुरक्षा दलांच्या ताब्यात दिली. गडचिरोली–गोंदिया–बालाघाट–उत्तर बस्तर या सर्व पट्ट्यात दशकानुदशके सक्रिय असलेली त्याची युनिट ही दक्षिणी एमएमसी झोनची शेवटची फळी मानली जात होती. ११ दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्यात एमएमसी झोनचा प्रवक्ता अनंत उर्फ विकास नागापुरे याने ११ माओवाद्यांसह शरणागती पत्करली होती. नागापुरे हा संघटनेची निवेदने, प्रचार आणि तांत्रिक समन्वय पाहणारा प्रमुख ‘मिडिया लिंक’ मानला जात होता. अनंतने शरण येताना आपल्या सहकाऱ्यांना रामधेरशी संपर्क वाढवा, त्यालाही बाहेर आणा, अशी जबाबदारी दिली होती. ठरल्याप्रमाणे काही दिवसांतच रामधेरचा गट पूर्णतः चळवळीतून बाहेर पडला आणि ८ डिसेंबरला पहाटे त्यांनी शस्त्रे खाली ठेवली.
एमएमसी झोनचा संपूर्ण पाडाव, एकाच आठवड्यात तीन मोठी समर्पणे
रविवारीच मध्यप्रदेशातील बालाघाट–मंडला पट्ट्यात केबी डिव्हिजनचे २ कोटी ३६ लाख इनाम असलेले १० माओवादी शरण आले होते. कान्हा–बांधवगड जंगलपट्ट्यात सक्रिय असलेल्या या गटामुळे मध्यप्रदेश आणि छत्तीसगड पोलिसांना सतत आव्हान होते. त्या आधी—गोंदियात अनंत नागापुरेचे समर्पण आणि आता रामधेरसह ११ जणांची शरणागती यामुळे एमएमसी झोनचे तीनही स्तर एकाच महिन्यात कोसळले. माओवादी चळवळीच्या अस्ताच्या प्रवासातील ही अतिशय महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.
मिलिंद तेलतुंबडेनंतर होती रामधेरवर जबाबदारी
माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे याच्या निधनानंतर रामधेर मज्जी याने एमएमसी झोनची जबाबदारी आपल्या शीरावर घेतली होती. तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात माओवादी चळवळ रुजविण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती, अनेक हिंसक कारवायांमध्ये तो सहभागी होता. अखेर त्याने चळवळीतील प्रवासाला पूर्णविराम देत शस्त्र टाकून संविधानाचा मार्ग स्वीकारला.