राकांँचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर
By Admin | Updated: June 25, 2014 23:45 IST2014-06-25T23:45:44+5:302014-06-25T23:45:44+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विदर्भात तीन ते चार जिल्हा परिषदांवर भाजपच्या मदतीने सत्ता मिळविली आहे. आता या सत्तेतील भागीदार असलेले राकाँचे काही पदाधिकारी भारतीय जनता पक्षात

राकांँचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर
निवडणुकीच्या तोंडावर : भाजप प्रवेशाच्या हालचाली सुरू
गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विदर्भात तीन ते चार जिल्हा परिषदांवर भाजपच्या मदतीने सत्ता मिळविली आहे. आता या सत्तेतील भागीदार असलेले राकाँचे काही पदाधिकारी भारतीय जनता पक्षात रितसर प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे खिंडार पडणार अशी शक्यता वर्तविली जात आहे.
१६ व्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पानिपत झाले. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला कितपत यश मिळते. याबाबत अनेक नेते साशंक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून पराभव पत्करण्यापेक्षा भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढण्याची त्यांनी तयारी चालविली आहे. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती अतिशय कमकूवत आहे. भाजपच्या कुबड्यांच्या भरवशावर चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अमरावती या जिल्हा परिषदांमध्ये राकाँने कशीबशी सत्ता मिळविली होती. अनेकदा जातीयवादी पक्षाशी असलेली युती तोडून टाकू, असे राकाँच्या नेत्यांनी जाहीर केले. मात्र कुणीही खुर्ची सोडली नाही. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील काही नेते तयारीला लागले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा आपल्या १९९९ च्या जुन्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या भरवशावर उभा राहिल, असे चिन्ह दिसत आहे. काँग्रेसकडे असलेल्या अनेक मतदार संघावर राकाँने आपला दावा सांगितला आहे. हे मतदार संघ आपल्या वाट्याला येणार नाही, याची पूर्ण कल्पना असलेले राकाँचे हे नेते आता भाजपच्या वाटेने मार्गस्थ होतील. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचीही या नेत्यांनी दिल्ली येथे भेट घेतली व गडचिरोली जिल्ह्यातील एका मतदार संघात उमेदवारी निश्चित करण्याबाबत चर्चा केली, अशी माहिती आहे. याबाबत भाजपच्या स्थानिक खासदारांनीही लोकमतशी बोलताना काही दिवसांपूर्वी दुजोरा दिला होता. मात्र अद्याप अंतिम चर्चा झालेली नाही, असे ते म्हणाले होते. हे नेते कोण असतील या विषयी भाजपसह राकाँच्याही गोटात उत्सुकता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)