अनेक पेट्रोल पंप बंद
By Admin | Updated: June 29, 2014 23:53 IST2014-06-29T23:53:28+5:302014-06-29T23:53:28+5:30
गडचिरोली शहरातील चार, आरमोरीतील १, देसाईगंज शहरातील २, चामोर्शी शहरातील २, यासह जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप पंपावरचा पेट्रोल व डिझेलचा साठा संपल्याने रविवारी बंद होते.

अनेक पेट्रोल पंप बंद
वाहनधारकांची फजिती : सुरू असलेल्या मोजक्या पंपावर प्रचंड गर्दी
गडचिरोली : गडचिरोली शहरातील चार, आरमोरीतील १, देसाईगंज शहरातील २, चामोर्शी शहरातील २, यासह जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप पंपावरचा पेट्रोल व डिझेलचा साठा संपल्याने रविवारी बंद होते. दरम्यान जिल्ह्यात मोजकेच पेट्रोलपंप सुरू होते. या पेट्रोलपंपावर वाहनधारकांची लांबच लांब रांग लागली होती. दरम्यान पेट्रोल व डिझेल तुटवड्यामुळे वाहनधारकांची चांगलीच फजिती झाली.
भारताला इराक देशातून पेट्रोलियम पदार्थाचा पुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही दिवसापासून इराकमध्ये अंतर्गत युध्द पेटले आहे. आंदोलकांनी बऱ्याचशा तेलाच्या खाणी व तेलशुध्दीकरण कारखाने ताब्यात घेऊन काम बंद पाडले आहे. देशासह राज्यभरात डिझेल व पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला आहे. नागपूर डेपोमध्ये डिझेल व पेट्रोलचा साठा उपलब्ध नाही. यामुळे जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसापासून पेट्रोल व डिझेलचा पुरवठा बंद झाला आहे.
लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातही पेट्रोलपंपावर डिझेल व पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक पेट्रोलपंप बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे गडचिरोली लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक वाहनधारकांनी गडचिरोलीकडे पेट्रोल व डिझेलसाठी धाव घेतली. मात्र गडचिरोली शहरात धानोरा मार्गावरील एकमेव पेट्रोलपंपावर दुपारी १ वाजतानंतर पेट्रोल, डिझेल विक्री सुरू झाली. रविवार आठवडी बाजारचा दिवस असल्याने अनेक नागरिक दुचाकी वाहनाने गडचिरोलीला आले होते. त्यामुळे धानोरा मार्गावरील पेट्रोलपंपावर वाहनधारकांची प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान या ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. गडचिरोली शहरासह देसाईगंज, आरमोरी, चामोर्शी, कुरखेडा, अहेरी, मुलचेरा व अन्य तालुक्यातही अनेक पेट्रोलपंप पेट्रोल उपलब्ध नसल्याने बंद होते. यामुळे तालुकास्तरावरील सुरू असलेल्या मोजक्याच पेट्रोलपंपावर प्रचंड गर्दी झाली होती. पेट्रोल नसलेल्या अनेक पेट्रोलपंपावर पेट्रोल डिझेल नाही, असे फलक लावण्यात आले होते. पेट्रोल तुटवड्यामुळे जिल्ह्यातील वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. (स्थानिक प्रतिनिधी)