मामेभाऊ आणि आत्येभावानेच केले 14 वर्षीय मुलीचे शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 05:00 IST2021-10-02T05:00:00+5:302021-10-02T05:00:42+5:30

ही मुलगी गडचिरोली तालुक्याच्या दक्षिण भागातील एका शासकीय आश्रमशाळेची विद्यार्थिनी आहे. कोरोना काळामुळे दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. पोळ्यानंतर काही आश्रमशाळा सुरू झाल्या. या मुलीची आश्रमशाळा महिनाभरापूर्वी सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र ती दीड महिन्याची गर्भवती आहे. त्यामुळे तिच्या लैंगिक शोषणाचा प्रकार शाळेत येण्यापूर्वीच गावात असताना घडला असल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक स्नेहल चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Mamebhau and Atyebhava exploited the 14-year-old girl | मामेभाऊ आणि आत्येभावानेच केले 14 वर्षीय मुलीचे शोषण

मामेभाऊ आणि आत्येभावानेच केले 14 वर्षीय मुलीचे शोषण

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एका अल्पवयीन मुलीचे तिच्या मामेभावाने आणि आत्येभावानेच लैंगिक शोषण करण्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आपण गर्भवती आहोत, हे त्या मुलीलाही माहीत नव्हते. आश्रमशाळा सुरू झाल्यानंतर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीत ही बाब उघडकीस आली. 
लैंगिक शोषण करणाऱ्यांपैकी एक सज्ञान, तर दुसरा आरोपी १६ वर्षांचा आहे. सज्ञान असलेल्या आरोपीला अटक केली, तर अज्ञान असलेल्या आरोपीला बाल न्यायालयाच्या आदेशानुसार आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.
ही मुलगी गडचिरोली तालुक्याच्या दक्षिण भागातील एका शासकीय आश्रमशाळेची विद्यार्थिनी आहे. कोरोना काळामुळे दीड वर्षापासून शाळा बंद होत्या. पोळ्यानंतर काही आश्रमशाळा सुरू झाल्या. या मुलीची आश्रमशाळा महिनाभरापूर्वी सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र ती दीड महिन्याची गर्भवती आहे. त्यामुळे तिच्या लैंगिक शोषणाचा प्रकार शाळेत येण्यापूर्वीच गावात असताना घडला असल्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक स्नेहल चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या प्रकरणातील १९ वर्षीय आरोपीचा पीसीआर संपताच त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

महिला व बाल रुग्णालयात उपचार

- पीडित मुलगी आश्रमशाळेत आल्यानंतर नेहमीप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यात ती गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगताच आश्रमशाळेच्या अधीक्षिकांसह सर्व जण अवाक् झाले. आश्रमशाळेत असताना ती गर्भवती झालीच कशी? या प्रश्नाने सर्वजण घाबरले होते. मात्र ती सहा आठवड्यांची गर्भवती असून गावात असतानाच तिचे शोषण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, सर्वांचाच जीव भांड्यात पडला. त्या मुलीवर महिला व बाल रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिला सुटी देण्यात आली. यावेळी एका  शिक्षिकेलाही रुग्णालयात ठेवण्यात आले हाेते.

आणखी एक विद्यार्थिनी गर्भवती
विशेष म्हणजे, सदर पिडीत मुलीसह आणखी एक आश्रमशाळेची विद्यार्थिनी गर्भवती आढळल्याची माहिती आहे. तिलाही महिला बाल रूग्णालयात उपचारासाठी आणले हाेते. परंतु तिच्यावरील उपचार गुंतागुंतीचे असल्यामुळे  तिला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. या रूग्णालयात उपचार घेतलेल्या विद्यार्थिनीवर यशस्वी उपचार झाले असून तिची प्रकृती आता चांगली असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. लैंगिक शाेषणाचा हा प्रकार धक्कादायक ठरला आहे.

 

Web Title: Mamebhau and Atyebhava exploited the 14-year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.