रोजगार निर्मितीसाठी शासन प्रयत्नशील
By Admin | Updated: February 15, 2016 01:28 IST2016-02-15T01:28:48+5:302016-02-15T01:28:48+5:30
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. मात्र दळणवळणाच्या सोयीअभावी उद्योग सुरू होऊ शकले नाही.

रोजगार निर्मितीसाठी शासन प्रयत्नशील
चामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. मात्र दळणवळणाच्या सोयीअभावी उद्योग सुरू होऊ शकले नाही. यापूर्वीच्या शासनाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे जिल्ह्याचा विकास खुटला. मात्र सध्याचे केंद्र व राज्यातील सरकार जास्तीतजास्त रोजगार निर्मितीसाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले.
तालुक्यातील राजगोपालपूर येथे आदिवासी संमेलन व शेतकरी, शेतमजूर, महिला बेरोजगारांचा मेळावा शनिवारी आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. देवराव होळी होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, प्रकाश गेडाम, जिल्हा सचिव डॉ. भारत खटी, स्वाभीमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, सरपंच गोहणे, शिक्षीका सुरजागडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार डॉ. देवराव होळी यांनी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली पाहिजे. धानाबरोबरच कापूस, मका, सूर्यफूल, मिरची आदी पिकांचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. जिल्ह्यामध्ये सिंचनाच्या सुविधा निर्माण व्हाव्या यासाठी शासनस्तरावरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सिंचन विहिरी खोदून दिल्या जात आहेत. त्याचबरोबर पाणी उपशाची साधणेही वितरित केली जात आहेत. शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामसेवक व तलाठी यांच्याकडून जाणून घेतली पाहिजे, असे प्रतिपादन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)