महावितरणला चोरांचा शॉक
By Admin | Updated: August 10, 2014 23:00 IST2014-08-10T23:00:50+5:302014-08-10T23:00:50+5:30
महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे.

महावितरणला चोरांचा शॉक
गडचिरोली : महावितरणचे बहुतांश कर्मचारी घरूनच कारभार हाकत असल्याने दुर्गम व ग्रामीण भागात विजेची चोरी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. याचा फटका महावितरणला बसत आहे.
अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या प्रमाणेच वीज हीसुद्धा आवश्यक गरज बनली आहे. घरातील बहुतांश साधणे विजेवरच चालत असल्याने विजेची मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यापर्यंत वीज पोहोचली असली तरी गडचिरोली जिल्हा मात्र याला अपवाद ठरत आहे. जिल्ह्यातील शेकडो गावांपर्यंत अजूनही वीज पुरवठा झाला नाही. आजही शेकडो गावे अंधारातच आहेत.
नक्षल्यांची भीती व गावापर्यंत पोहोचण्यास रस्ता नाही. हे कारण पुढे करीत महावितरणचे बहुतांश कर्मचारी ग्रामीण भागात प्रत्यक्ष जात नाही. पावसाळ्याचे चार महिने तर महावितरणचे कर्मचारी गावाचा उंबरठाही झिजवित नाही. याचा फायदा स्थानिक नागरिकांकडून घेण्यात येते. बहुतांश गावामध्ये सायंकाळच्या सुमारास पथदिव्यांवरील तारावर आखोडा टाकून विजेची चोरी केली जाते. त्यानंतर सकाळीच आखोडा काढून जात असल्याने वीज चोरीचा पत्ताच लागत नाही. अशा पद्धतीने ग्रामीण व दुर्गम भागात विजेची खुलेआम चोरी केली जात आहे. महावितरणचे कर्मचारी गावाला भेट देत नाही. हे पक्के ठाऊक असल्याने दिवसेंदिवस विजेच्या चोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
लोकसंख्येनुसार व विद्युतजोडणीच्या संख्येनुसार महावितरणच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. हे सूत्र राज्याच्या इतर भागात योग्य असले तरी या सूत्राची गडचिरोली जिल्ह्यात अंमलबजावणी करून त्यानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे चुकीचे आहे. कारण गडचिरोली जिल्ह्यातील लोकसंख्या विरळ आहे. एका गावामध्ये केवळ १० ते १५ च्या संख्येत विद्युत जोडण्या दिसून येतात. महावितरणच्या या चुकीच्या नियमामुळे एका कर्मचाऱ्याकडे ३० ते ४० किमी अंतराच्या गावांमधील काम सोपविले जाते. जवळपास ४० ते ५० गावांचा कारभार त्याला बघावा लागतो. हे सर्व करतांना महावितरणच्या कर्मचाऱ्याचे दमछाक उडते ही वीज चोरीच्या प्रमाणात वाढ होण्याचे महत्वाचे कारण आहे.
वीज चोरी व वीज गळतीच्या प्रमाणात वाढ झाल्याने महावितरण कंपनीला तोट्याचा सामना करावा लागतो. हा तोटा वीजबिल वाढवून इतर ग्राहकांकडून वसूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सर्व चुकीचे आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून कर्मचाऱ्यांना कामाला लावावे व कर्मचाऱ्यांवरील भार कमी करण्यासाठी अधिकचे कर्मचारी नियुक्त करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. जिल्ह्यातील भामरागड, सिरोंचा, कोरची, धानोरा, एटापल्ली तालुक्यातील दुर्गम भागात वीज चोरीचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)