प्रेम, पळून जाऊन लग्न, संशयकल्लोळ आणि शेवटी पत्नीचा गळफास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 11:38 IST2025-05-16T11:37:49+5:302025-05-16T11:38:57+5:30
जयनगरातील घटना : दोन चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले

Love, elopement, suspicion, and finally the wife suicide
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी: प्रेयसी अल्पवयीन असतानाच तिला पळवून नेत बाहेरगावी संसार थाटला. मुलीच्या आई-वडिलांनी अकांडतांडव करून पोलिसांत केस केली. प्रियकरावर गुन्हा दाखल झाला. आई-वडिलांचे काळीज. अखेर केस मागे घेतली. मुलीच्या संसारवेलीवर अपत्यरूपी दोन फुले उमलली; पण दहा वर्षाच्या संसाराला कुणाची दृष्ट लागली. पती-पत्नीत संशयकल्लोळ माजला. पतीचे कथित विवाहबाह्य संबंध पत्नीला सहन झाले नाही. अन् तिने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही हृदयद्रावक घटना जयनगर येथे गुरुवार, १५ मे रोजी पहाटे उघडकीस आली.
संगीता श्रीनिवास सरकार (२८, रा. विजयनगर), असे मृत विवाहितेचे नाव आहे. जयनगर येथील संगीता गणेश मंडल हिचे विक्रमपूर येथील श्रीनिवास गिरेन सरकार (३४) या तरुणासोबत २०१३ मध्ये लग्न झाले. अल्पवयात मुलीला पळवून नेल्याची तक्रार गणेश मंडल यांनी श्रीनिवास यांच्याविरोधात चामोर्शी ठाण्यात दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून श्रीनिवासविरोधात गुन्हा दाखल झाला. काही दिवस ते दोघेही फरार होते. संगीताच्या आई-वडिलांचा राग शांत झाल्यानंतर ते परतले. श्रीनिवासला अटक झाली. १८ दिवसांचा कारावासही झाला. अखेर संगीताच्या आई वडिलांनी केस मागे घेतली. श्रीनिवासला जामीन मिळाला. दोघेही विजयनगर येथे सुखाने संसार करीत होते. दरम्यान, त्यांच्या संसारवेलीवर ब्रावन व श्रेयशी ही दोन अपत्यरूपी फुले उमलली.
संसार झाला उद्ध्वस्त
काही वर्षांनी श्रीनिवास हा ठेकेदारीच्या कामानिमित्त पत्नी व दोन मुलांसह एटापल्ली येथे राहत होता. याचवेळी श्रीनिवासचे एटापल्ली येथील एका महिलेशी विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याचा संशय संगीताने घेतला. यावरून दोघांत वारंवार भांडणे व्हायची. दरम्यान, ती माहेरी जयनगर येथे आली. १४ मे रोजी कुटुंबातील सर्व सदस्य झोपी गेल्यानंतर तिने आष्टी रोडलगतच्या आंब्याच्या झाडाला गळफास घेतला. ही घटना गुरुवारी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अमुल कादबाने यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक राधा शिंदे, पोलिस नाईक अतुल मडावी करीत आहेत.