जननी सुरक्षा योजनेत तोटा
By Admin | Updated: August 9, 2014 23:43 IST2014-08-09T23:43:19+5:302014-08-09T23:43:19+5:30
आरोग्य विभागामार्फत महिला व बालकांसाठी विविध सोयीसुविधा योजनांच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी शासनातर्फे जननी सुरक्षा योजना ही

जननी सुरक्षा योजनेत तोटा
गडचिरोली : आरोग्य विभागामार्फत महिला व बालकांसाठी विविध सोयीसुविधा योजनांच्या माध्यमातून राबविल्या जात आहेत. बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी शासनातर्फे जननी सुरक्षा योजना ही महत्वपूर्ण योजना राबविली जात आहे. सुरूवातीच्या काळात सदर योजनेचा लाभ गैरप्रकारामुळे मातांपर्यंत पोहोचत नव्हता. त्यामुळे या योजनेतील गैरप्रकार टाळण्यासाठी अकाऊंट पे धनादेश दिल्या जात आहे. परंतु यासाठी बँकेत खाते उघडण्याची सक्ती करण्यात आली आहे. मात्र ७०० रूपयांच्या लाभासाठी ६०० रूपये भरून खाते उघडण्याच्या कामात लाभार्थ्यांना भूर्दंड सहन करावा लागत आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत २००८ पासून जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आली. घरी होणाऱ्या बाळंतपणामुळे बालमृत्यू व मातामृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन सदर योजना सुरू करण्यात आली. अनुसूचित जाती, जमाती व दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ दिला जातो. याअंतर्गत रूग्णालयात बाळंतपण झाल्यास ७०० रूपये तर घरी बाळंतपण झाल्यास ५०० रूपये दिले जाते. सिझरिअन झाल्यास २ हजार २०० रूपये दिले जातात. यापूर्वी या लाभाची रक्कम बाळंतीणीच्या नावाने धनादेशाद्वारे दिली जात होती. अनेक बाळंतीणींना या योजनेचा लाभही मिळाला. परंतु काळानुसार सदर योजना बाळंतीणीपर्यंत पोहोचण्यास अडचण निर्माण झाली. अनेक ठिकाणी या योजनेत गैरप्रकार आढळून आले. बाळंतीणीपर्यंत या योजनेचा लाभ मिळण्यास अडथळा निर्माण झाला. काही ठिकाणी दलालांनी निधी उचलून हडप केल्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत सदर योजनेचा लाभ पोहोचत नव्हता. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने डिसेंबर २०१२ पासून नवीन दिशा निर्देश जारी केले.
लाभार्थ्यांना देण्यात येणारा धनादेश हा अकाऊंट पे असावा, असे निर्देश देण्यात आले. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याला राष्ट्रीयकृत बँकेचे खाते उघडणे सक्तीचे करण्यात आले. बँकेत खाते उघडण्यासाठी किमान ५०० रूपये सुरूवातीस जमा करावे लागतात. शिवाय छायाचित्र, ओळखीचा पुरावा, ये-जा करण्याचा खर्च जवळपास ६०० रूपयाच्यावर येतो. शासनाच्यावतीने केवळ ७०० रूपयांचा लाभ बाळंतीणींना दिला जातो. त्यामुळे ७०० रूपयांच्या लाभासाठी ६०० रूपयांच्यावर खर्च करणे, शिवाय अनेकदा बँक व रूग्णालयाच्या हेलपाट्या माराव्या लागतात. त्यामुळे सदर योजनेचा लाभ हा योजनेच्या लाभासाठी होणाऱ्या खर्चापेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे. शिवाय आर्थिक भूर्दंड व तणाव हा वेगळाच. त्यामुळे जननी सुरक्षा योजनेचा लाभ हा फायद्याहून अधिक तोट्याचाच असल्याचे चित्र आहे.