गेवर्धा येथील विश्रामगृहाची दुरवस्था
By Admin | Updated: July 1, 2014 01:29 IST2014-07-01T01:29:29+5:302014-07-01T01:29:29+5:30
तालुक्यातील गेवर्धा येथील विश्रामगृहाची आठ वर्षापूर्वी नक्षल्यांनी जाळपोळ केली होती. त्यानंतर या विश्रामगृहाची दुरूस्ती केली नसल्याने सदर विश्रामगृह मोडकळीस आले आहेत.

गेवर्धा येथील विश्रामगृहाची दुरवस्था
कुरखेडा : तालुक्यातील गेवर्धा येथील विश्रामगृहाची आठ वर्षापूर्वी नक्षल्यांनी जाळपोळ केली होती. त्यानंतर या विश्रामगृहाची दुरूस्ती केली नसल्याने सदर विश्रामगृह मोडकळीस आले आहेत. विश्रामगृह दुरूस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने गेवर्धा येथे विश्रामगृह बांधले आहे. यापरिसरात येणारे अनेक शासकीय अधिकारी या ठिकाणी मुक्कामास राहत होते. मात्र २६ जानेवारी २००६ रोजी गणतंत्रदिनी नक्षल्यांनी हे विश्रामगृह जाळून टाकले. तेव्हापासून या विश्रामगृहाची दुरूस्ती करण्यात न आल्याने विश्रामगृह मोडकळीस आले आहे. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने विश्रामगृहाची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. इमारतीवरील कवेलू फुटले आहेत. लाकडी फाट्यांनी वाळवी लागली आहे. सततच्या पावसामुळे फाटे कुजण्याच्या मार्गावर आहेत. नक्षल्यांनी आग लावल्यानंतर विश्रामगृहातील आतील भाग जळाला. त्यामुळे भिंती काळवंटल्या आहेत. या विश्रामगृहाची साफसफाई केली जात नसल्याने सगळीकडे घाण पसरली आहे. इमारतीची डागडुजी केल्यास इमारत राहण्यासाठी कामी येऊ शकते.
गेवर्धा येथे असलेले विश्रामगृह गेवर्धावासीयांसाठी एक अभिमानाची बाब होती. कुरखेडा परिसरात आलेले अधिकारी किंवा कर्मचारी सायंकाळी उशीर झाल्यानंतर याच ठिकाणी मुक्कामाने राहत होते. विश्रामगृहात राहण्याच्या निमित्याने नेहमी अधिकारी येत असल्याने गेवर्धावासीयांसाठी अभिमानाची बाब ठरली होती. मात्र विश्रामगृह जळाल्यानंतर गेवर्धा येथे अधिकाऱ्यांचे येण्याचे प्रमाण अगदी नगण्य झाले आहे. आणखी काही दिवस या इमारतीची डागडुजी करण्यास विलंब झाल्यास इमारतीचे अस्तित्वच नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डागडुजीसाठी अत्यंत कमी खर्च येणार असतांनाही प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. सदर इमारतीची तत्काळ दुरूस्ती करण्यात यावी. जेणे करून या परिसरात येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी निवासाची सोय होईल, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. अशाच प्रकारच्या जिल्हाभरातील शेकडो इमारतींकडे दुर्लक्ष झाले आहे.