अहेरीच्या भूमी अभिलेख कार्यालयाला ठोकले कुलूप
By Admin | Updated: June 25, 2014 00:27 IST2014-06-25T00:27:10+5:302014-06-25T00:27:10+5:30
येथील भूमीअभिलेख कार्यालयात २२ पैकी १५ पदे रिक्त आहेत. कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्त न केल्यामुळे तालुक्यातील नागरिक व शेतकरी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

अहेरीच्या भूमी अभिलेख कार्यालयाला ठोकले कुलूप
रिक्त पदांचा प्रश्न : श्रीराम जन्मोत्सव समितीचे आंदोलन
अहेरी : येथील भूमीअभिलेख कार्यालयात २२ पैकी १५ पदे रिक्त आहेत. कर्मचारी व अधिकाऱ्यांची नियुक्त न केल्यामुळे तालुक्यातील नागरिक व शेतकरी यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या कार्यालयातील निमतानदार जी. के. महल्ले यांची अहेरीवरून नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे बदली करण्यात आली आहे. या बाबीच्या निषेधार्थ श्रीराम उत्सव समिती अहेरीच्यावतीने भूमीअभिलेख कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले.
भूमीअभिलेख कार्यालयात कर्मचाऱ्यांची २२ पैकी ७ केवळ पदे भरलेले आहे. अत्यल्प कर्मचाऱ्यामुळे जमिनीचे मोजमाप, फेरफार होण्यास अडचण येत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून उपअधीक्षकाचे पद रिक्त आहे. भामरागडचे उपअधीक्षक एस. ए. बोरसे यांच्याकडे प्रभार देण्यात आला आहे. तसेच सिरस्तेदार, मुख्यसहाय्यक, निमतानदार क्रमांक १ व २, आवक-जावक लिपिक, कनिष्ठ लिपिक, भूपस्थापक २ पद, लिपिक व ३ शिपाई असे पद रिक्त आहेत. आलापल्ली व अहेरी गावाचा सीटी सर्व्हे तसेच जमिन मोजणीचे कामही रखडलेले आहे. या संदर्भात जमाबंदी आयुक्त पूणे, उपसंचालक नागपूर व जिल्हा अधीक्षक भूमीअभिलेख अधिकारी यांच्याशी पदभरतीबाबत चर्चा करण्यात आली. मात्र त्यांच्याकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने अखेर श्रीराम जन्मोत्सव समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भूमीअभिलेख कार्यालयाला कुलूप ठोकले. यावेळी परिसरातील दोनशे ते तीनशे गावकरी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. आंदोलनानंतर अहेरी कार्यालयात तीन कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीचे आदेश काढण्यात आले, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)