शेतकऱ्यांना मॅटनर्सरीचे धडे
By Admin | Updated: July 19, 2014 23:55 IST2014-07-19T23:55:43+5:302014-07-19T23:55:43+5:30
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील मारकबोडी येथे शेतकरी पुरूष बचतगटाला यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड

शेतकऱ्यांना मॅटनर्सरीचे धडे
गडचिरोली : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील मारकबोडी येथे शेतकरी पुरूष बचतगटाला यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करण्यासाठी मॅटनर्सरीचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मारकबोडी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी मॅटनर्सरीचे धडे गिरविले.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करण्यासाठी पुरूष शेतकरी बचतगटाला यंत्र पुरविण्यात आले. या शेतकरी बचतगटाला आत्मा व कृषी कार्यालयाच्या तज्ज्ञांनी प्रात्यक्षिकासह मॅटनर्सरीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक गौतम जांभुळकर यांनी यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करण्यासाठी मॅटनर्सरी कशी तयार करावी, याची प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, १ एकर क्षेत्रासाठी १२ मीटर रूंदीचे व १० मीटर लांबीचे २ बेड तयार करावे, त्यासाठी प्रथम रोेपवाटीकेतील जमीन समपातळीत आणावी, दोन बेडमध्ये पाणी निघून जाण्यासाठी अंतर असावे, रोपवाटीकेसाठी वापरावयाच्या मातीत कंपोस्ट व गांडूळ खत मिसळवावे, माती व खताच्या मिश्रणामध्ये कोणत्याही परिस्थितीत लहान, मोठे दगड नसावे, यंत्रामध्ये दगड अडकल्यास रोवणी कामाचा खोळंबा होऊ शकतो, असेही जांभुळ यांनी यावेळी सांगितले.
कृषी विज्ञान केंद्र सोनापूरचे डॉ. प्रशांत सोळुंखे यांनी भात लागवड पद्धतीबाबत उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, समपातळीत तयार केलेल्या बेडवर पॉलिथीन कागद अंतरून त्यावर लोखंडी फ्रेमच्या सहाय्याने खतमिश्रीत मातीचा चिखल पसरवावा, यासाठी २१ बाय २५ सेमी, बाय २ सेमी आकाराची फ्रेम वापरावी. या पॉलिथीन कागदावर मातीचे चौकोनी आकाराचे केक तयार होतील, एकरी १५ ते २० किलो बियाणे वापरावे, असे सांगितले. तयार केलेल्या मातीच्या केकवर मोड आलेले बियाणे अलगदपणे पसरवावे, या बियाणांवर तणीस पसरवावी, सुरूवातीस या बियाण्याला दिवसातून दोन ते तीन वेळा झारीच्या सहाय्याने पाणी द्यावे, चार-पाच दिवसानंतर बियाणे उगविलेले दिसतात. त्यानंतर झाकलेली तणीस काढून टाकावी, १२ ते १५ सेमी उंचीचे रोपे मशीनच्या सहाय्याने लागवडीसाठी तयार होतात. त्यानंतर यंत्राच्या सहाय्याने रोवणी करावी, असेही सोळुंखे यावेळी म्हणाले. याप्रसंगी नोजेंद्र लांडगे यांनी भात रोवणी यंत्राची वैशिष्टे व काळजी याबाबत माहिती दिली. यावेळी परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)