८३ गावांतील जमिनीची चाचणी

By Admin | Updated: December 11, 2015 01:52 IST2015-12-11T01:52:02+5:302015-12-11T01:52:02+5:30

राष्ट्रीय शाश्वत शेती अंतर्गत जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाने जिल्हाभरातील

Land testing of 83 villages | ८३ गावांतील जमिनीची चाचणी

८३ गावांतील जमिनीची चाचणी

शेतकऱ्यांना मार्गदर्शक : मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाचा उपक्रम
गडचिरोली : राष्ट्रीय शाश्वत शेती अंतर्गत जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाने जिल्हाभरातील ८३ गावांमधील जवळपास १५ हजार हेक्टर जमिनीमधील नमुने घेऊन त्यांची चाचणी केली आहे. चाचणी झालेल्या जमिनीच्या मालकांना आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात येणार आहे.

जमिनीचा प्रकार व पीक यांचा थेट संबंध आहे. पिकाला योग्य असलेल्या जमिनीत लागवड झाल्यास त्या ठिकाणी कमी खर्चात शेतीतून चांगले उत्पादन मिळत असल्याचे संशोधनाअंती सिध्द झाले आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतातील जमिनीमध्ये कोणते घटकद्रव्य आहेत. हे माहित असणे अत्यंत गरजेचे आहे.
प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचे आरोग्य कळावे यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय शास्वत शेती हा उपक्रम हाती घेतला. या अंतर्गत देशभरातील संपूर्ण जमिनीची तपासणी केली करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाच्या वतीने २०१५-१६ या आर्थिक वर्षात १३ हजार ६५९ नमुने घेण्याचे उद्दीष्ट ठरविण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात एप्रिल २०१५ ते नोव्हेंबर २०१५ पर्यंत ८३ गावांमधील १ हजार ७७१ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. चाचणी झालेल्या नोंदणीकृत ३ हजार १३१ शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिकेचे वितरण केले जाणार आहे. काही शेतकऱ्यांची नोंदणी झाली नाही. मात्र संबंधित शेतकऱ्याच्या शेतांतर्गत येणाऱ्या भागामध्ये मृद चाचणी झाली असल्यास संबंधित शेतकऱ्याने मागणी केल्यास त्यालाही आरोग्य पत्रिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्हा मृद चाचणी सर्वेक्षण विभागाकडे २ हजार ५९७ नमुने दाखल झाले होते. त्यापैकी १ हजार ७७१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. गडचिरोली तालुक्यातील १२०, धानोरा २१६, देसाईगंज १ हजार ६१, आरमोरी २३८, कोरची ९६, कुरखेडा तालुक्यातील ४० नमुने तपासण्यात आले आहेत. मृद चाचणीमुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचे आरोग्य कळण्यास मदत झाली आहे. त्यामुळे ते जमिनीच्या पोतानुसार पिकाची लागवड करू शकणार आहेत. (नगर प्रतिनिधी)

चाचणी झालेल्या गावांची नावे
मृद चाचणी झालेल्या गावांमध्ये कोटगल, मुडझा, पारडी, नवेगाव, धानोरा तालुक्यातील मिचगाव, केसनिल, बोरी, येरसगोंदी, पदाबोरीया, हिपानेर, बोदीन, पाथरगोटा, रोठारिल, गुरानटोला, रूपीनगट्टा, तुळमेघ, कोंडेवाडा, हंटाझूर, निमगाव, मासरी घाटा, निमनवाडा, रांगी, देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा, विहिरगाव, पोटगाव, विठ्ठलगाव, पिंपळगाव, किन्हाळा, डोंगरगाव, अरततोंडी, फरी, चिखली, उसेगाव, विसोरा, एकलपूर, आमगाव, बोडधा, बोडधा तुकूम, सावंगी, गांधीनगर, कुरूड, शंकरपूर कसारी, कळमगाव, शेलदा, डोंगरमेंढा, कोरेगाव व चोप, आरमोरी तालुक्यातील नागरवाही, मानापूर, कोसरी, देलनवाडी, मांगदा, नवरगाव मक्ता, मंजेवाडा, खैरी रिठ, देवीपूर, बोडधा चक, चिचोली, हिरापूर रिठ, मोहझरी, मुल्लूर चक, रवी, सुकाळा, मेंढेबोडी, कोरची तालुक्यातील बोटेझरी, नारकसा, न्याहालड, टेकामेटा, पुलरगोंदी, कहाकाबोडी, भिमनकोजी, रानगट्टा, तलवारगड, कुरखेडा तालुक्यातील ठुसी, येडसकुही रिठ, कमलपाल, चरवीदंड, गांगसाय टोला, जांभळी या गावांचा समावेश आहे.

मृदा चाचणीची गती संथ
दर तीन वर्षाने जमिनीतील नत्र, स्पुरद, पालाश, सामू यांच्या प्रमाणात बदल होत असल्याने दर तीन वर्षांनी मृदा तपासणी होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील एकूण शेत जमिनीचे ४० हजार ९७७ नमुने निघतात. त्यानुसार दरवर्षी जवळपास १३ हजार नमुन्यांची तपासणी होणे गरजेचे असल्याने तेवढेच लक्षांक ठेवण्यात आले आहे. मात्र डिसेंबर महिना सुरू झाला तरी केवळ २ हजार ५९७ नमुने प्राप्त झाले आहेत. त्यातही केवळ १ हजार ७७१ नमुन्यांची चाचणी पूर्ण झाली आहे. पुढील पाच महिने शिल्लक असले तरी नमुने तपासणीची गती लक्षात घेतली तर मार्च अखेरपर्यंतही लक्षांकापर्यंत कठीण होणार आहे.

नाममात्र दरात होते नमुना चाचणी
शाश्वत शेती अंतर्गत कृषी सहायक स्वत:च मातीचे नमुने घेऊन येतात. या नमुन्यांची तपासणी पूर्णपणे मोफत केली जाते. मात्र एखाद्या शेतकऱ्याने स्वत:च्या जमिनीची वैयक्तिक चाचणी करतो म्हटल्यास त्यालाही अत्यंत नाममात्र शुल्क आकारले जाते. सर्वसाधारण नमुन्यासाठी ३५ रूपये व सुक्ष्म नमुन्यासाठी २३५ रूपये शुल्क आकारल्या जाते.

Web Title: Land testing of 83 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.