कुनघाडा रै. येथील धान केंद्र १५ दिवसांपासून बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 06:00 IST2020-03-04T06:00:00+5:302020-03-04T06:00:22+5:30
राज्य शासनामार्फत यावर्षी हमी भावाबरोबरच ७०० रुपये बोनस जाहीर केला आहे. खुल्या बाजारापेक्षा अधिक भाव मिळत असल्याने शेतकरी खरेदी केंद्रावर धान विक्रीस प्राधान्य देत आहेत. ज्या शेतकऱ्यांना धान विक्री करायची आहे, अशा शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्राच्या व्यवस्थापकाकडे सातबारा जमा केला आहे. या घटनेला आता दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र अजूनपर्यंत या शेतकऱ्यांचे धान खरेदी केले नाही.

कुनघाडा रै. येथील धान केंद्र १५ दिवसांपासून बंदच
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोधी (मो.) : गोदाम फुल्ल झाल्याचे कारण पुढे करून कुनघाडा रै. येथील धान खरेदी केंद्र मागील १५ दिवसांपासून बंद आहे. शेकडो क्विंटल शेतकऱ्यांचे धान केंद्र परिसरात काटा न होताच पडून आहेत.
राज्य शासनामार्फत यावर्षी हमी भावाबरोबरच ७०० रुपये बोनस जाहीर केला आहे. खुल्या बाजारापेक्षा अधिक भाव मिळत असल्याने शेतकरी खरेदी केंद्रावर धान विक्रीस प्राधान्य देत आहेत. ज्या शेतकऱ्यांना धान विक्री करायची आहे, अशा शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्राच्या व्यवस्थापकाकडे सातबारा जमा केला आहे. या घटनेला आता दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र अजूनपर्यंत या शेतकऱ्यांचे धान खरेदी केले नाही. धान खरेदी केंद्रावर धानाचे वजन करण्यासाठी एकच काटा आहे. त्यामुळे धान खरेदी अतिशय संथपणे होत होती. प्रत्येक गावासाठी विशिष्ट दिवस नेमून दिला होता. सातबारा दिलेल्या शेतकºयांपैकी केवळ ७० शेतकऱ्यांच्याच धानाचा काटा केला आहे. उर्वरित धानाचा काटा झाला नाही. गोदाम फुल्ल झाला असल्याने धान खरेदी करणे शक्य नाही, असे कारण सांगितले जात आहे.
केंद्रावर शेकडो शेतकऱ्यांचे हजारो धानाचे पोते पडून आहेत. शेतकरी दरदिवशी केंद्रात जाऊन धानाची राखन करीत आहेत. धान खरेदीला नेमके कधी सुरूवात होईल, याचे उत्तर केंद्रातील व्यवस्थापकाकडून दिले जात नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पाऊस झाल्यास या ठिकाणच्या धानाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कर्ज भरण्याची तारीख आली जवळ
बहुतांश शेतकरी पीक कर्ज घेतात. सदर कर्जाचा भरणा ३१ मार्चपूर्वी केल्यास व्याज माफ केले जाते. ३१ मार्च नंतर एक दिवसही अधिकचा झाला तर संपूर्ण वर्षभराचे व्याज आकारले जाते. शेतकऱ्यांकडे धान आहेत. मात्र त्याची विक्री झाली नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांनी धान विकले आहे, त्याचे पैसे मिळाले नाही. कर्ज भरण्याची तारीख जवळ येत आहे. मात्र पैसे जवळ नसल्याने कर्ज कसे भरावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. शासनाच्या चुकीमुळे अनेकांचे कर्ज थकीत पडण्याची शक्यता आहे.