कोटगल परिसर झाला बनावट दारूविक्रीचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 06:00 IST2019-08-26T06:00:00+5:302019-08-26T06:00:22+5:30
गडचिरोली तालुक्यातील कोटगल, इंदाळा, मुरखडा हा परिसर बनावट दारू विक्रीचे केंद्र झाला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात लगतच्या गोंदिया जिल्ह्यातून बनावट दारूची आयात होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या भागावर लक्ष केंद्रीत करून कारवाया सुरू केल्या असल्या तरी मुख्य आरोपी पोलिसांना हुलकावण्यात देत आहे.

कोटगल परिसर झाला बनावट दारूविक्रीचे केंद्र
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील कोटगल, इंदाळा, मुरखडा हा परिसर बनावट दारू विक्रीचे केंद्र झाला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात लगतच्या गोंदिया जिल्ह्यातून बनावट दारूची आयात होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या भागावर लक्ष केंद्रीत करून कारवाया सुरू केल्या असल्या तरी मुख्य आरोपी पोलिसांना हुलकावण्यात देत आहे.
गडचिरोली, धानोरा, आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी, कुरखेडा, कोरची या तालुक्यांमध्ये छत्तीसगडसह गोंदिया जिल्ह्यातून दारूचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत आहे. देसाईगंज पोलिसांनी गेल्या आठवडाभरापासून गोंदिया जिल्ह्यातून येणाऱ्या दारूच्या वाहनांवर कारवाया सुरू केल्या आहे. मात्र तरीही ही वाहतूक सुरूच असल्यामुळे या व्यवसायात अनेक लोक गुंतले असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातच गोंदियात विक्री होणारी दारू बनावट असल्यामुळे मद्यप्रेमींचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे त्या दारू विक्रेत्यांबद्दल नागरिकांमध्ये ओरड सुरू आहे.
कोटगल, इंदाळा, मुरखडा या भागातील वाढते दारूविक्रीचे प्रस्थ पाहून नुकतेच स्थानिक गुन्हे शाखेला रुजू झालेले पोलीस निरीक्षक उल्हास भुसारे यांनी गेल्या ३-४ दिवसात कारवाया सुरू केल्या. या दारूसाठा जप्तीसह काही जणांना ताब्यातही घेण्यात आले. पण काही प्रमुख आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही.
एलसीबीसोबतच गडचिरोली ठाण्यानेही या भागात लक्ष केंद्रीत केल्यास बनावट दारू विक्रीला आळा बसू शकेल. पोळ्याच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी दारू विक्रीला आणखी उधाण येणार आहे.