कोसरी, येंगलखेडा रखडलाच; एमआयडीसीचा पत्ता नाही
By Admin | Updated: December 5, 2015 09:07 IST2015-12-05T09:07:30+5:302015-12-05T09:07:30+5:30
आरमोरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी या चार तालुक्यात विविध समस्या अजूनही शासनस्तरावरून दुर्लक्षित आहेत.

कोसरी, येंगलखेडा रखडलाच; एमआयडीसीचा पत्ता नाही
देसाईगंजच्या रुग्णालयात असुविधा : बाजार समितीचे विभाजन; देसाईगंज बसस्थानकही रखडले
गडचिरोली : आरमोरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी या चार तालुक्यात विविध समस्या अजूनही शासनस्तरावरून दुर्लक्षित आहेत. नगर परिषद असलेल्या देसाईगंज तालुका मुख्यालयात ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची केवळ २५ टक्के पदे भरलेली आहे. ७५ टक्के रिक्तपदे असल्याने या ठिकाणी चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा मिळण्यास अडचण येत आहे. छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या कोरची तालुक्यात अनेक गावातील रस्ते उखडून गेले आहेत. मात्र रस्त्याच्या कामांकडेही शासनाचे दुर्लक्ष आहे. १५ वर्षांपूर्वी कोसरी व येंगलखेडा या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. हे प्रकल्प आघाडी सरकारच्या काळात पूर्ण करण्यात आले. मात्र येथे प्रत्यक्ष सिंचन अजूनही सुरू झालेले नाही. आरमोरी बाजार समितीचे विभाजन करून देसाईगंज येथे बाजार समिती देण्यात यावी, ही मागणीही शासनस्तरावर प्रलंबित आहे.
देसाईगंज येथे स्वतंत्र बाजार समिती हवी
आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत चार तालुके येतात. यात देसाईगंजचाही समावेश आहे. देसाईगंज हे मोठ्या बाजारपेठेचे ठिकाण असून आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करून देसाईगंज ही स्वतंत्र बाजार समिती निर्माण करावी, अशी मागणी या भागातील व्यापारी व शेतकऱ्यांची आहे. यासंदर्भात शासनाकडे मागील दहा वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. देसाईगंजला उपबाजारपेठेचा दर्जा देण्यात आला असला तरी येथे मात्र सोयीसुविधांचा अभाव आहे. तीन लाखांच्या जवळ सेस येथून जातो. त्यामुळे येथे स्वतंत्र बाजार समिती निर्माण करण्याबाबत शासन उदासीन आहे. यापूर्वी सहकार राज्यमंत्र्यांनाही याबाबत निवेदन देण्यात आले.
ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये आजारी
कुरखेडा व आरमोरी या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आहे. तर कोरची व देसाईगंज येथे ग्रामीण रुग्णालय आहे. उपजिल्हा रुग्णालयात अनेक वैद्यकीय अधिकारी प्रतिनियुक्तीवर आहेत. ते जिल्हा सामान्य रुग्णालयातही काम करतात. कोरची व देसाईगंज रुग्णालयात ७५ टक्के वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचीं पदे रिक्त आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव असल्याने या रुग्णालयातून गंभीर आजाराचे रुग्ण ब्रह्मपुरी वा गडचिरोली येथे पाठविले जातात. वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्याकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष आहे. कोरची या दुर्गम तालुक्यात नुकतीच मलेरियाची साथ आली. त्यावेळी आठ ते नऊ डॉक्टर पाठविण्यात आले. परंतु पुन्हा येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोसळलेल्या स्थित आहे. रुग्णालयाच्या अनेक समस्या मागील १५ वर्षांपासून कायम असून त्या सोडविण्यात आलेल्या नाहीत.
सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधीचा पत्ता नाही
कुरखेडा तालुक्यात येंगलखेडा व आरमोरी तालुक्यात कोसरी या सिंचन प्रकल्पांना २००९ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली. १७.७० कोटी रूपयांचा येंगलखेडा व २६.४६ कोटी रूपये किंमतीचा कोसरी प्रकल्प आहे. येंगलखेडा प्रकल्पाच्या धरणाचे काम पूर्ण झाले असून लाभ क्षेत्राचे काम प्रगतीपथावर आहे. जून २०१७ अखेर हा प्रकल्प पूर्ण होईल, असा प्रशासनाचा दावा आहे. तर कोसरी प्रकल्पाच्या धरणाचे काम ७० टक्के पूर्ण झाले असून चव्हेला गावाचे पुनर्वसन करण्याचे काम रखडलेले आहे. त्यामुळे या प्रकल्पातून अजूनही सिंचन होण्यास अडचण आहे. याशिवाय या मतदार संघात डोंगरगाव-ठाणेगाव उपसा सिंचन योजना, तुलतुली हा मोठा सिंचन प्रकल्प, कुरखेडा तालुक्यात सती, कोरची तालुक्यात खोब्रागडी हे लघु प्रकल्प वनकायद्यामुळे रखडून पडले आहेत. देऊळगाव-डोंगरसावंगी, शंकरपूर या उपसा सिंचन योजनांचेही काम प्रलंबित आहे.