कोंढाळा वैनगंगा नदीपात्र अवैध रेती तस्करीचे बनले माहेरघर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:37 IST2021-04-08T04:37:09+5:302021-04-08T04:37:09+5:30
नदीघाटांचे दरवर्षी लिलाव होऊन काेट्यवधी रुपयांचा महसूल शासनास एकट्या देसाईगंज तालुक्यातून मिळताे. सध्या वैनगंगा नदी घाटांचे लिलाव न झाल्याने ...

कोंढाळा वैनगंगा नदीपात्र अवैध रेती तस्करीचे बनले माहेरघर
नदीघाटांचे दरवर्षी लिलाव होऊन काेट्यवधी रुपयांचा महसूल शासनास एकट्या देसाईगंज तालुक्यातून मिळताे. सध्या वैनगंगा नदी घाटांचे लिलाव न झाल्याने अवैध रेती चोरीचे प्रमाण वाढले आहे. विनापरवाना वाहतूक करून रेती चोर मालामाल होत आहेत. कोंढाळा गावापासून अगदी काही अंतरावर वैनगंगा नदी आहे. याच संधीचा फायदा काही ट्रॅक्टरधारक व इतर घेत असून, नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा करून रेती विक्री करीत आहेत. अवैध रेतीच्या उपशामुळे नदीपात्र खोलगट बनत आहे. हजारो ब्रास रेतीचा उपसा यापूर्वी व सद्य:स्थितीत सुरूच आहे. ट्रॅक्टरधारकांचे सर्वत्र धागेदोरे व जाळे पसरले असल्याने मोबाइल संपर्काद्वारे सर्वत्र संपर्क करून इकडे-तिकडे हालहवाला घेतला जातो व रेतीचा अवैधरीत्या उपसा केला जातो. रेतीचा अवैधरीत्या उपसा करण्यासाठी रात्री १२ वाजेनंतरचा कालावधी निवडला जाताे. शासन स्तरावरून कितीही कठोर व ठोस पावले उचलली जात असली तरी रेतीचा अवैध उपसा करून चोरीची रेती विकली जातच आहे. लाखो रुपयांचा दंड आकारूनही दंडाला न जुमानता ‘चलती का नाम गाडी’ असे चित्र निर्माण झाले आहे; परंतु शासनस्तरावरून रेती चोरीला आळा घातला जात नसल्याने अवैध व्यावसायिकांचे फावले आहे. महसूल प्रशासनाने याेग्य उपाययाेजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.