निराधार वृद्धांच्या पाेषणालाही बसताहे काेराेनाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:37 IST2021-04-07T04:37:52+5:302021-04-07T04:37:52+5:30
गडचिराेली : शासनाच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत गडचिराेली जिल्ह्यासह राज्यभरात अनुदानित वृद्धाश्रम, अनाथ मुला-मुलींच्या निवासी शाळा चालविल्या जातात. मात्र काेराेना ...

निराधार वृद्धांच्या पाेषणालाही बसताहे काेराेनाचा फटका
गडचिराेली : शासनाच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत गडचिराेली जिल्ह्यासह राज्यभरात अनुदानित वृद्धाश्रम, अनाथ मुला-मुलींच्या निवासी शाळा चालविल्या जातात. मात्र काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे शासनाकडून निधी खर्चाला कात्री लावल्या जात असून याचा फटका अनाथ मुले व वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्धांच्या परिपाेषणालाही बसत आहे.
गडचिराेली येथील एकमेव माताेश्री वृद्धाश्रमाला शासनाकडून जीआर निर्गमित हाेऊनही एकही रुपयाचे अनुदान सध्या मिळाले नाही. परिणामी या वृद्धाश्रमात विविध साेयीसुविधा देण्यासाठी तसेच वृद्धांच्या पालणपाेषणासाठी आर्थिक चणचण सहन करावी लागत आहे. सन १९९८ मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री मनाेहर जाेशी यांच्या हस्ते माताेश्री वृद्धाश्रमाच्या इमारतीचा उद्घाटन साेहळा पार पडला हाेता. या सरकारच्या काळात ३१ मार्च २००२ पर्यंत वृद्धाश्रमाला अनुदान मिळत हाेते. मात्र त्यानंतर सरकार बदलले व अनुदानाला पूर्णत: ब्रेक लागला. दरम्यान २०२० मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. या सरकारने नवा जीआर काढून संस्थेअंतर्गत राज्यातील सर्व मान्यताप्राप्त वृद्धाश्रम व अनाथ मुलांच्या शाळांना अनुदान लागू केले. हे अनुदान लवकर मिळावे, अशी मागणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यरत कर्मचाऱ्यांनी केली आहे.
बाॅक्स...
पावसाळ्यात जाणवते वीजेची समस्या
शासनमान्य माताेश्री वृद्धाश्रम विवेकानंदनगरात पाण्याच्या टाकीजवळ शेवटच्या भागात आहे. सुमारे पाच एकर जागेत वृद्धाश्रमाचा परिसर आहे. सरकारच्या सहकार्यातून वृद्धाश्रमाची इमारत बांधण्यात आली. मात्र सरकारकडून नियमित अनुदान मिळत नसल्याने वीज पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला. दरम्यान संस्थेच्या वतीने या ठिकाणी साैरऊर्जेतून विद्युत व्यवस्था करण्यात आली. उन्हाळ्यात व हिवाळ्यात समस्या उद्भवत नाही. मात्र पावसाळ्यात येथे बऱ्याचदा अंधार असताे.
बाॅक्स...
कर्मचारीही संकटात
माताेश्री वृद्धाश्रमात एकूण सहा कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये व्यवस्थापक/अधीक्षक, कनिष्ठ लिपीक, परिचारिका, चाैकीदार, काळजीवाहक व स्वयंपाकी आदींचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांना संस्थेकडून मानधन दिले जाते. मात्र संस्थेला सरकारकडून नियमित अनुदान मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांच्या मानधनावरही परिणाम हाेत आहे. आर्थिक अडचणीमुळे कर्मचारी हैराण झाले आहेत.
बाॅक्स...
अशी आहे व्यवस्था
माताेश्री वृद्धाश्रमातील वृद्धांच्या पालनपाेषणासाठी संस्थेसह देणगीदारांचे सहकार्य लाभत आहे. जवळपास २० देणगीदार मासिक वर्गणी देणारे असून त्यांच्या वर्गणीतून किराणा, भाजीपाला, गॅस व इतर खर्च भागविला जाताे. संस्थेकडूनही इतर खर्चाचा काही वाटा उचलला जाताे. येथे सद्य:स्थितीत वृद्ध महिला व पुरूष वास्तव्यास आहेत. दाेन्ही जिल्ह्यातील वृद्धांना येथे प्रवेश दिला जाताे.
काेट...
शिवसेना युती सरकारच्या काळात वृद्धाश्रमातील वृद्धांच्या परिपाेषणाकरिता व इतर बाबींसाठी अनुदान मिळाले हाेते. १ एप्रिल २००२ पासून अनुदान मिळणे पूर्णत: बंद झाले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर माताेश्री वृद्धाश्रमाला अनुदान देण्यासाठी जीआर निर्गमित करण्यात आला. ३१ मार्च २०२१ पर्यंत अनुदान प्रत्यक्ष मिळणार हाेते. मात्र काेराेना संकटामुळे अनुदानाची रक्कम प्राप्त झाली नाही. प्रती वृद्धांना प्रती महिना परिपाेषणाकरिता १५०० रुपये व कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी अनुदान मिळणार आहे. अनुदान न मिळाल्याने वृद्धाश्रम चालविण्यासाठी अडचणी येत आहेत. शासनाने अनुदान लवकर दिल्यास वृद्धांना चांगल्या साेयीसुविधा देणे साेपे जाईल. दातृत्वाची भूमिका बाळगून असणाऱ्या देणगीदारांची मदत मिळत असल्याने संस्थेला आधार आहे. अनुदान मिळाल्यानंतर पूर्ण सुविधा करू.
- सुनील पाेरेड्डीवार, सचिव, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, गडचिराेली