कमलापूर समस्याग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:31 AM2021-05-03T04:31:02+5:302021-05-03T04:31:02+5:30

कमलापूर : अहेरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कमलापूर येथे सोयी-सुविधांची भरमार असणे जनतेला अपेक्षित होते. परंतु, कित्येक ...

Kamalapur problematic | कमलापूर समस्याग्रस्त

कमलापूर समस्याग्रस्त

Next

कमलापूर : अहेरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कमलापूर येथे सोयी-सुविधांची भरमार असणे जनतेला अपेक्षित होते. परंतु, कित्येक वर्षांपासून येथील ग्रामस्थांना मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

सौर बॅटऱ्या गायब

आष्टी : वीज वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे हे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनले आहेत.

गोकुलनगरात पोलीस चौकीची मागणी

गडचिरोली : येथील गोकुलनगरात चोरी व गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे येथे पोलीस चौकी स्थापन करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अनेक दिवसांपासून नगरात अवैध दारूविक्रीही वाढली आहे.

झिंगानूर येथे विद्युत उपकेंद्र निर्माण करा

झिंगानूर : येथे विद्युत उपकेंद्र निर्माण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. झिंगानूरपासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बामणी येथून वीजपुरवठा या परिसरात केला जात आहे. दूरवरून वीजपुरवठा होत असताे.

कुरखेड्यात टिल्लू पंपांचा वापर

कुरखेडा : शहरातील अनेक प्रभागांमध्ये घरगुती नळाला मोटारपंप लावून वरच्या मजल्यावर सर्रास पाणी खेचले जात आहे. यामुळे इतर नागरिकांच्या नळाला पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नळ जोडणीची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

रानवाही मार्ग खड्ड्यात

धानोरा : तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या चव्हेला ग्रामपंचायतीमधील रानवाही या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. चव्हेला-रानवाही या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाल्याने या भागातील वाहनधारक व प्रवाशांची मोठी पंचाईत होत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

बाेगस देयके वाढली

गडचिरोली : जिल्हाभरातील काही दुकानदार नकली बिल देऊन ग्राहक व शासनाची फसवणूक करत आहेत. नकली बिल देणाऱ्या दुकानदारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष हाेत असल्याने अनेक दुकानदार बाेगस बिल ग्राहकांना देत आहेत.

निराधारांचे अनुदान वाढवा

कुरखेडा : निराधारांना शासनाकडून प्रतिमहा अत्यल्प अनुदान दिले जाते. हे अनुदान अत्यंत कमी आहे. महागाईत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनुदानातही वाढ करावी, अशी मागणी अनेकदा करण्यात येऊनही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई वाढत असल्याने अनुदान तुटपुंजे ठरत आहे.

प्रसुतीगृहात सुविधा द्या

आरमोरी : जिल्ह्यातील ३७६ आरोग्य केंद्रांपैकी ३५४ उपकेंद्रांमध्ये प्रसुतीगृह बांधण्यात आले आहे. मात्र, ही प्रसुतीगृह अत्यंत लहान असून, त्यामध्ये आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांचा अभाव असल्याने गरोदर मातांना प्रचंड यातना सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे प्रसुतीगृहात सुविधा द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

मच्छरदाण्या पुरवा

अहेरी : अहेरी, भामरागड, गडचिरोली या तीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत जिल्ह्यात १००च्या आसपास शासकीय आश्रमशाळा चालवल्या जातात. मात्र, बहुतांश आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बेड व मच्छरदाणीची सुविधा नाही. त्यामुळे मच्छरदाण्यांचा पुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.

तंमुसला प्रशिक्षण द्या

गडचिरोली : गावात क्षुल्लक कारणावरून तंटे निर्माण होऊ नयेत, झालेच तर ते गावपातळीवरच मिटवून गावात शांतता, व्यसनमुक्ती व्हावी, यासाठी तंमुसची स्थापना करण्यात आली. तंमुसचा कारभार चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी सदस्यांना प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

झुडपी जंगल शेतीला द्या

गडचिरोली : जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये झुडपी जंगल आहे. हे जंगल शेतकऱ्यांना शेतजमिनीसाठी उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. वाढत्या लोकसंख्येबरोबरच जमिनीचे तुकडेही वाढत चालले आहेत. कमी जमिनीत यांत्रिकीकरण करणे शक्य होत नाही.

कुंपणाअभावी नुकसान

गडचिरोली : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने तार कुंपणाचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या तारांचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे. शेतपिकांच्या संरक्षणासाठी सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना काटेरी तार पुरविण्यात यावी.

Web Title: Kamalapur problematic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.