कैकाडी वस्ती विकासाच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: July 18, 2014 00:05 IST2014-07-18T00:05:18+5:302014-07-18T00:05:18+5:30
चामोर्शी मार्गावर असलेल्या कैकाडी वस्तीमध्ये मूलभूत सायीसुविधा पुरविण्याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कैकाडी समाजाच्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कैकाडी वस्ती विकासाच्या प्रतीक्षेत
गडचिरोली : चामोर्शी मार्गावर असलेल्या कैकाडी वस्तीमध्ये मूलभूत सायीसुविधा पुरविण्याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कैकाडी समाजाच्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मागील अनेक वर्षांपासून चामोर्शी मार्गावरील शहराच्या बाहेर कैकाडी समााजाचे नागरिक वास्तव्यास आहेत. या वस्तीमध्ये जवळपास ६०० नागरिक राहत आहेत. मात्र साधे विद्युत खांबसुद्धा या वस्तीपर्यंत आले नाही. त्यामुळे नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागत आहे. विद्यार्थ्यांना रात्री अभ्यास करण्याची अडचण होत असल्याने या समाजाचे विद्यार्थी शिकुन मोठे कसे होणार असल्याने असा गहण प्रश्न पालकांना पडला आहे.
संपूर्ण शहराला नळांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येते. शहरात एखादी नवीन वस्ती उदयास येताच त्या वस्तीत विनाविलंब विद्युत व नळाची पाईपलाइन टाकण्यात येते. मात्र दहावर्षापेक्षा जास्त कालावधी होऊनही या वस्तीला पाणीपुरवठा करण्याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. पाईपलाइन टाकण्याविषयी तत्कालीन नगराध्यक्षांना निवेदन दिले. पाईपलाइन टाकण्यासाठी २५ लाख रुपयाचा खर्च येईल असे सांगुन निवेदन देणाऱ्यांना परत पाठविण्यात आले होते.
खासदार अशोक नेते यांनी निवडणुकीपूर्वी या वस्तीला भेट दिली होती. भेटीदरम्यान ‘सबका साथ सबका विकास’चा नारा देत या कैकाडी वस्तीला आवश्यक सोयीसुविधा पुरविण्याचे आश्वासन दिले होते. आता ते खासदार म्हणून निवडून आले आहेत. केंद्रात त्यांची सत्ता आहे. त्यामुळे निधी खेचून आणून या वस्तीमध्ये विद्युत, नळाद्वारे पाणीपुवठा, रस्ते या सुविधा निर्माण करून देऊन घरकुल बांधून द्यावे, अशी अपेक्षा येथील नागरिक करीत आहेत.
नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनींचेही याकडे दुर्लक्ष झाले असल्याने कैकाडी समाजाच्या नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. एखाद्या नेत्याच्या वाढदिवशी वस्तीत पेढे वाटून स्वत:ची प्रसिद्धी करणे एवढ्यापुरताच या समाजातील नागरिकांचा वापर केला जातो. निवडणुकीच्यावेळी मतांचा जोगवा मागणारे लोकप्रतिनीधी निवडणूक संपल्यानंतर या वस्तीकडे ढुंकुणही पाहत नाही. या वस्तीतील नागरिकांना किमान माणूस म्हणून जगता यावे यासाठी आवश्यक सोयीसुविधा पुरविण्यात याव्या, अशी मागणी बाशीद शेख यांच्यासह कैकाडी समाजातील नागरिकांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)