कामगारांचे चारित्र्य पाहिले जाते का ? वाढणाऱ्या गुन्हेगारीमुळे नागरिक चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 16:58 IST2025-01-18T16:57:26+5:302025-01-18T16:58:31+5:30
लहान कंपन्यांमध्ये बगल : परस्पर केली जाते नेमणूक

Is the character of the workers being looked at? Citizens are worried due to increasing crime
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मोठमोठ्या शहरांत कंपन्यांमध्ये कामगार वा कर्मचाऱ्यांची भरती करताना चारित्र्य पडताळणी करण्यात येते. त्यानंतरच सदर कर्मचाऱ्याची नेमणूक केली जाते. गडचिरोली जिल्ह्यात निवडक कंपन्या आहेत. या ठिकाणी कर्मचारी भरती करताना त्यांची चारित्र्य पडताळणी होत असली तरी लहान कंपन्यांमध्ये चारित्र्य पडताळणी केली जात नाही.
जिल्ह्यात सुरजागड लोहप्रकल्प व कोनसरी येथील स्टील प्रकल्पाव्यतिरिक्त अन्य मोठे प्रकल्प नाहीत. खासगी कंपन्यांचे उद्योगधंदे बोटावर मोजण्याएवढेच आहेत. विशेष म्हणजे, सुरक्षा रक्षक म्हणून विविध कंपन्यांतर्गत कामगार विविध आस्थापनांमध्ये पुरवले जातात. यामध्ये बँका, विद्यापीठ, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, तसेच महिला व बालरुग्णालय आदी आस्थापनांचा समावेश आहे.
या ठिकाणी कामगार पुरवण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडून चारित्र्य प्रमाणपत्र घेतलेले असले तरी लहान कंपन्यांमध्ये कामगारांकडून चारित्र्य प्रमाणपत्र घेतले जात नाही. अशी स्थिती जिल्ह्यात दिसून येत आहे.
६०% कर्मचाऱ्यांची नेमणूक चारित्र्य प्रमाणपत्राशिवाय केली जाते. ४० टक्केच कर्मचाऱ्यांची नेमणूक विविध कंपन्यांमध्ये चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर केल्यानंतर होते.
पोलिस ठाण्यात होते चारित्र्य पडताळणी
चारित्र्य पडताळणी करण्यासाठी संबंधित व्यक्तीला त्याच्या हद्दीतील पोलिस ठाण्यात अर्ज करावा लागतो. येथे अर्ज केल्यानंतर त्या व्यक्तीचा जुना रेकॉर्ड तपासला जातो किंवा त्या व्यक्तीच्या नावे काही गुन्हे आहेत काय, हे तपासले जाते. त्यानंतरच कामावर नेमणूक केली जाते.
चारित्र्य पडताळणी आवश्यक का ?
कंपनी किंवा अन्य शासकीय आस्थापनांमध्ये कामगारांची नेमणूक करताना सदर कामगाराची पार्श्वभूमी काय आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा तर नाही ना, आदी कारणांचा शोध घेण्यासाठी चारित्र्य पडताळणी केली जाते.
जिल्ह्यात गुन्हेगारी नियंत्रणात
मोठ्या जिल्ह्यांच्या तुलनेत किंवा विदर्भातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत येथे गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. सामाजिक सलोखा असल्याने गावखेड्यांसह शहरातही वातावरण शांत असते.
या पदांसाठी करतात चारित्र्य पडताळणी
- कंपन्या किंवा शासकीय आस्थापनांमध्ये सुरक्षारक्षक, कामगार, शासकीय सेवक आदी पदांवर नेमणुकीसाठी संबंधित व्यक्तीचे चारित्र्य तपासले जाते.
- याकरिता त्या व्यक्तीकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मागविले जाते. संबंधित व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीचा असेल तर त्या व्यक्तीला सेवेत घेतले जात नाहीत.
- सदर पडताळणीमुळे कामगाराची विश्वसनीयता तपासली जाते.