चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लॉयड मेटल्सच्या लोह खनिज प्रक्रिया प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन चार वर्ष झाले. ७०० कोटी रुपयांच्या त्या प्रकल्पातून १२०० कामगारांना कोनसरी येथील प्रकल्पामध्ये कायमस्वरूपी नोकऱ्या मिळतील, त्यामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त प्रत्येक शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दिली जाईल, अशी ग्वाही दिली होती. पण प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही.
लॉयड्स कंपनीच्या या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. त्यामुळे जोपर्यंत कंपनी कोनसरीच्या लोह खनिज प्रकल्पाचे काम मार्गी लावत नाही तोपर्यंत सूरजागड येथून वाहतूक हाेणारे लोह खनिज कोणत्याही प्रकारे चंद्रपूर आणि अन्यत्र कुठेही जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नाही. ही बाब प्रशासनाने त्वरित कंपनीच्या निदर्शनास आणून द्यावी, अशी मागणी डॉ. होळी यांनी केली आहे.
(बॉक्स)
शेतकरी, आदिवासींसोबत विश्वासघात
कोनसरी गावातील अनेक शेतकऱ्यांनी भविष्यातील आपल्या पिढ्यांचा विचार करून आपल्या सोन्यासारख्या जमिनी कवडीमोल भावाने प्रकल्पासाठी दिल्या. पण अद्यापपर्यंत कंपनीने प्रकल्प उभारण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले नाही.
असे असताना लॉयड मेटल्स अँड एनर्जी ही कंपनी कोनसरी येथील प्रकल्प चालू न करता सूरजागड येथून लोह खनिज परस्पर चंद्रपूर येथे प्रक्रियेसाठी घेऊन जाण्याची तयारी करत आहे. हा कोनसरी भागातील शेतकऱ्यांशी कंपनीचा विश्वासघात असून हे कृत्य निंदनीय आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्त व आदिवासींच्या तोंडाला पाने पुसणारे असल्याचे डाॅ. होळी यांनी म्हटले.