लोहखनिज उद्योग रखडलेलेच
By Admin | Updated: August 9, 2014 23:42 IST2014-08-09T23:42:06+5:302014-08-09T23:42:06+5:30
गडचिरोली या नक्षल प्रभावित जिल्ह्यात लोहखनिजाचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत. या खनिजाच्या भरवशावर येथे उद्योग सुरू करण्यासाठी शासनाने अनेक उद्योजकांना लिज प्रदान केली होती.

लोहखनिज उद्योग रखडलेलेच
नक्षलग्रस्त भाग : मायनिंग कंपनीच्या उपाध्यक्षाच्या हत्येचा परिणाम
गडचिरोली : गडचिरोली या नक्षल प्रभावित जिल्ह्यात लोहखनिजाचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत. या खनिजाच्या भरवशावर येथे उद्योग सुरू करण्यासाठी शासनाने अनेक उद्योजकांना लिज प्रदान केली होती. मात्र नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे ८ ते १० वर्षाचा कालावधी लोटूनही येथे उद्योग सुरू होऊ शकले नाही. गतवर्षी मायनिंग कंपनीच्या एका उपाध्यक्षाची नक्षलवाद्यांनी हत्या केल्याने आता येथून लिज घेतलेल्या कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळलेला आहे. त्यामुळे येथे मायनिंग उद्योग येण्याची आशा पूर्णत: मावळली आहे.
जिल्ह्यात लोहखनिज, सिमेंट याचे साठे मोठ्या प्रमाणावर असल्याने २००८ नंतर जिल्ह्यात मायनिंग उद्योगाला चालना देण्यासाठी काही खाजगी उद्योगांना लिज देण्यात आली. यामध्ये लॉयड्स मेटल अॅन्ड इंजिनिअरिंग कंपनीला ३४८.९ हेक्टर, गोपानी आयर्न अॅन्ड पॉवर कंपनीला १५३.०९ हेक्टर, इस्पात इंडस्ट्रीजला २०५० हेक्टर, गोपानी आयर्न अॅन्ड पॉवर कंपनीला एटापल्ली तालुक्यात धमकोंडावाडी येथे २९५ हेक्टर जागा लीजवर देण्यात आली आहे. तर अहेरी तालुक्यातील देवलमरी येथे वायएमएस कंपनी २५२ हेक्टर, गुजरात अंबुजा सीमेंट २७१ हेक्टर, सनप्लॅग आयर्न अॅन्ड स्टील कंपनीला बांडे गावाजवळ २३६.७५ हेक्टर, कोरची तालुक्यातील मसेली गावाजवळ सुरजागड स्टील अॅन्ड माईन्स कंपनीला ५० हेक्टर जागेवर लीज देण्यात आली होती. काही उद्योगाला गडचिरोली येथील औद्योगिक वसाहतीत भुखंड देण्यात आले होते. मात्र त्यांनी विहित कालावधीत उद्योग सुरू न केल्याने त्यांचे भुखंड आरक्षण रद्द करून ही जागा आता पोलीस प्रशासनाच्या हवाईपट्टीसाठी शासनाने प्रदान केली आहे. तर ज्या उद्योजकांनी एटापल्ली तालुक्यात उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या एका अधिकाऱ्याची व उपाध्यक्षाची हत्या झाल्याने त्यांनीही त्यानंतर हा प्रयत्न सोडून दिला, अशी माहिती आहे. एकूणच मोठी खनिज संपत्ती असतानाही येथे खनिजावर आधारित उद्योग केवळ माओवाद्यांच्या विरोधामुळे रखडलेले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)