भाजप जिल्हाध्यक्षांच्या विरोधात अंतर्गत वाद पेटला

By Admin | Updated: June 25, 2014 23:46 IST2014-06-25T23:46:06+5:302014-06-25T23:46:06+5:30

१६ व्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होऊन भारतीय जनता पक्षाच्या महायुतीने राज्यात अभूतपूर्व यश मिळविले. गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघातही भाजपने २ लाख ३६ हजाराच्या

Internal dispute arose against BJP District President | भाजप जिल्हाध्यक्षांच्या विरोधात अंतर्गत वाद पेटला

भाजप जिल्हाध्यक्षांच्या विरोधात अंतर्गत वाद पेटला

गडचिरोली : १६ व्या लोकसभेच्या निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होऊन भारतीय जनता पक्षाच्या महायुतीने राज्यात अभूतपूर्व यश मिळविले. गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघातही भाजपने २ लाख ३६ हजाराच्या प्रचंड मताधिक्याने विजय मिळविला. मात्र आरमोरी विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या देसाईगंज गावात भाजपला तोकडे बहुमत मिळालेले आहे. भाजपची सत्ता असलेल्या या गावात जिल्हाध्यक्ष असतानाही पक्षाला मिळालेले अत्यल्प मतदान हे भाजपच्या अनेक जुन्या नेत्यांच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे देसाईगंजचे नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांच्या विरोधात पक्षात अंतर्गत प्रचंड धुसपूस वाढली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कानावरही ही बाब जुन्या भाजप नेत्यांनी घातली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार खासदार अशोक नेतेही या प्रकाराबाबत प्रचंड नाराज असल्याचे समजते.
लोकसभा निवडणुकीत गडचिरोली जिल्ह्याच्या तीनही विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्ष महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्य मिळाले. गडचिरोली विधानसभा मतदार संघात ६९ हजाराची आघाडी भाजपने घेतली. अहेरी विधानसभा मतदार संघात ४२ हजाराची आघाडी तर आरमोरी विधानसभा मतदार संघात ४३ हजाराची आघाडी भाजपला मिळाली. मात्र देसाईगंज गावात भारतीय जनता पक्षाची नगर पालिकेवर सत्ता असताना केवळ १५०० मतांची आघाडी पक्षाला मिळाली आहे. शहरातील सहा मतदान केंद्रावर काँग्रेस भाजप उमेदवारापेक्षा पुढे आहे. देशभर मोदीलाट असताना देसाईगंजच्या सहा वार्डात काँग्रेस कशी काय आघाडी घेतो हा सर्वात गहन प्रश्न भाजपच्या नेत्यांना पडला आहे. देसाईगंज तालुक्यात भाजपच्या दिवंगत माजी आमदार इंदूताई नाकाडे यांचा गट सक्रियरित्या गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहे. मात्र देसाईगंज शहराची जबाबदारी भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे यांच्याकडे होती. त्यांच्या नेतृत्वात त्यांच्याच गावात पक्षाला मानहानीजनक मताधिक्य मिळाले आहे. प्रचारादरम्यानही उमेदवार अशोक नेते यांना याची चाहूल लागलेली होती. परंतु त्यांनी स्वतंत्र यंत्रणा लावून काम मार्गी लावले होते. जिल्हाध्यक्ष उमेदवारावर नाराज असल्याचे बोलल्या जात होते. त्याचा फटका या निवडणुकीत बसला. या संदर्भात देसाईगंज येथील राधेशाम काबरा यांनी लेखी स्वरूपात नितीनजी गडकरी यांच्याकडे तक्रार केली. मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही अलिकडेच या प्रकाराची माहिती गडकरी यांना दिली, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे सध्या जिल्हाध्यक्ष अनेकांच्या अजेंड्यावर आलेले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Internal dispute arose against BJP District President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.