वाहनचालकांना विमा बंधनकारक
By Admin | Updated: September 25, 2015 02:03 IST2015-09-25T02:03:06+5:302015-09-25T02:03:06+5:30
केंद्र शासनाने अटल पेंशन योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केल्या आहेत.

वाहनचालकांना विमा बंधनकारक
परिवहन आयुक्तांचे निर्देश : अटल पेंशन योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा काढल्यानंतरच मिळणार परवाना
गडचिरोली : केंद्र शासनाने अटल पेंशन योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केल्या आहेत. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन चालविण्याचा परवाना व योग्यता प्रमाणपत्रासाठी आलेल्या वाहनचालकांना या दोन्ही योजनांचे सर्वप्रथम सदस्यत्व बंधनकारक करावे. त्यानंतरच प्रमाणपत्र द्यावे, असे निर्देश परिवहन आयुक्त यांनी २३ सप्टेंबर रोजी काढलेल्या परिपत्रकातून राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व सर्व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिले आहेत. त्यामुळे आता वाहनचालकांना या दोन्ही योजनांचे लाभार्थी बणने आवश्यक झाले आहे.
म्हातारपणात नागरिकाला एक निश्चित उत्पन्न मिळत राहिल्यास त्याला परावलंबी जीवन जगण्याची पाळी येत नाही. त्यासाठी केंद्र शासनाने अटल पेंशन योजना सुरू केली आहे. या योजनेत १८ ते ४० वर्ष वयाचे नागरिक सहभागी होऊ शकतात. किमान २१० ते १ हजार ४५४ रूपयांपर्यंतचा मासिक प्रिमिअम भरता येतो. वयाच्या ६० वर्षानंतर सदर नागरिकास पेंशन मिळण्यास सुरुवात होते. त्याचबरोबर केंद्र शासनाने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली आहे. सदर योजना अपघातात लाभार्थ्याला विमा सुरक्षा पुरविते. विशेष म्हणजे केवळ १२ रूपयांत लाभार्थ्याला वर्षभर विमा संरक्षण दिले जाते. या कालावधीत लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या नातेवाईकांना दोन लाख रूपयांची मदत दिली जाते.
वाढत्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे वाहनचालकाचा विमा असणे अत्यंत गरजेचे झाले आहे. १२ रूपयांचा विमा प्रत्येक वाहनचालक काढू शकतो. मात्र बऱ्याचशा वाहनचालकांना याबाबतची माहिती नाही किंवा वेळ मिळत नसल्याने ते काढत नाही.
योग्यता प्रमाणपत्र मिळविणे, नवीन वाहनचालक परवाना काढणे व या परवान्याचे नुतनिकरण करणे यासाठी वाहनचालक व मालक हमखास प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात जातात. परिवहन विभागाने विमा योजनांचा लाभ घेणे बंधनकारक केल्यास वाहनचालकांना सुरक्षा प्राप्त होईल. त्याचबरोबर विमा काढणाऱ्यांची संख्याही वाढेल. ही बाब लक्षात घेऊन प्रमाणपत्रासाठी आलेल्या प्रत्येक मालक व चालकाला अटल पेंशन योजना व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेची माहिती परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी द्यावी. त्या व्यक्तीचा विमा निघाला नसल्यास व अटल पेंशन योजनेचा लाभ त्याने घेतला नसल्यास त्याला या दोन्ही योजनांचा लाभ घेणे आदी बंधनकारक करावे. त्यानंतरच त्याची पुढची कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता बहुतांश वाहनचालक व मालकांचा परवाना निघेल, अशी अपेक्षा आहे. (नगर प्रतिनिधी)