तंबाखूमुक्त समुपदेशन केंद्राचे उद्घाटन
By Admin | Updated: August 16, 2014 23:29 IST2014-08-16T23:29:45+5:302014-08-16T23:29:45+5:30
राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय तंबाखूनियंत्रण कार्यक्रमामार्फत जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, तंबाखूमुक्ती समुपदेशन केंद्राचे उद्घाटन जिल्हा

तंबाखूमुक्त समुपदेशन केंद्राचे उद्घाटन
गडचिरोली : राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय तंबाखूनियंत्रण कार्यक्रमामार्फत जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून, तंबाखूमुक्ती समुपदेशन केंद्राचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारुखी यांच्या हस्ते करण्यात आले. तंबाखू सेवन केल्याने होणाऱ्या दुष्परिणामापासून लोकांचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी व त्यासाठी लोकांची क्षमता बनवण्यासाठी तंबाखूमुक्ती समुपदेश केंद्राची स्थापना करण्यात आली.
जिल्ह्यातील महिला व पुरूष तंबाखूजन्य पदार्थांच्या आहारी गेले आहेत. तंबाखूजन्य पदार्थाच्या आहारी गेलेल्या नागरिकांना तंबाखूपासून मुक्त करण्यासाठी मानसोपचार पद्धतीचा अवलंब करून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित करण्यात यावे व त्या माध्यमातून गडचिरोली जिल्हा तंबाखूमुक्त करण्यात यावा, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. सदर कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. के. गौतम, राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमाच्या कविता साहू तसेच सामान्य रुग्णालय गडचिरोलीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन योगेश नाथे, राहुल कनकनालवार व पवन दारोकर यांनी केले होते. (शहर प्रतिनिधी)