अपुऱ्या पावसाने पीक धोक्यात
By Admin | Updated: August 19, 2014 23:43 IST2014-08-19T23:43:18+5:302014-08-19T23:43:18+5:30
यावर्षीच्या पावसाळ्यात निम्म्यापेक्षाही कमी पाऊस झाला आहे. परिणामी तलावांमध्ये ५० टक्क्यापेक्षाही कमी जलसाठा आहे. मागील १५ दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारल्याने धानपिकाच्या

अपुऱ्या पावसाने पीक धोक्यात
गडचिरोली : यावर्षीच्या पावसाळ्यात निम्म्यापेक्षाही कमी पाऊस झाला आहे. परिणामी तलावांमध्ये ५० टक्क्यापेक्षाही कमी जलसाठा आहे. मागील १५ दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारल्याने धानपिकाच्या रोवणीचे कामे पूर्णपणे थांबली आहेत. तर दुसरीकडे रोवलेले धानपीक करपायला लागले असल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. ही परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात असल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी होत आहे.
यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे ९४ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावर रोवणी व ५४ हजार ४६० हेक्टर क्षेत्रावर आवत्याचे नियोजन करण्यात आले होते. पावसाळ्याच्या अगदी सुरूवातीपासूनच पावसाने धक्के द्यायला सुरूवात केली. आजपर्यंत केवळ सरासरी ६५८.४३ मीमी पाऊस पडला आहे. दरवर्षीच्या पावसाच्या तुलनेत हे प्रमाण निम्यापेक्षाही कमी आहे. त्यामुळे रोवणीचे कामेही लांबली आहेत. १६ आॅगस्टपर्यंत केवळ ७३ टक्के रोवणीचे कामे पूर्ण झाली आहेत. तर आवत्यालाही बाशी करणे व निंदा काढण्याचे काम शिल्लक आहे. मागील १५ दिवसांपासून पावसाने कायमची दडी मारली आहे. त्यामुळे रोवलेले धानपीक करपायला लागले आहेत. तलावांमध्ये जमा झालेल्या पाण्याच्या भरवशावर काही शेतकऱ्यांनी रोवणीचे कामे आटोपली आता हे तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहेत. दिवसभर पडणाऱ्या कडक उन्हामुळे धानपीक करपायला लागले आहे. तर दुसरीकडे तलावामध्ये जलसाठा नसल्याने धानपिकाला जलसिंचन कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. आतापासून पावसाने दडी मारल्यास संपूर्ण धानपीक धोक्यात येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. ही परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात असल्याने बाराही तालुक्यांमध्ये शासनाने दुष्काळ घोषीत करावा, अशी मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)