महाराष्ट्रातील 'या' गावात विहिरीला गरम पाणी; थंड पाणी मिसळल्याशिवाय हातही घालता येईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 14:21 IST2025-09-05T14:20:20+5:302025-09-05T14:21:14+5:30

Gadchiroli : हे पाणी एवढे गरम आहे की, त्यात थंड पाणी मिसळल्याशिवाय हातही घालता येत नाही, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांत मोठे कुतूहल निर्माण झाले आहे.

In this village in Maharashtra, the well has hot water; You can't even put your hands in it without mixing it with cold water | महाराष्ट्रातील 'या' गावात विहिरीला गरम पाणी; थंड पाणी मिसळल्याशिवाय हातही घालता येईना

In this village in Maharashtra, the well has hot water; You can't even put your hands in it without mixing it with cold water

लोकमत न्यूज नेटवर्क
कमलापूर (ता. अहेरी) :
अहेरी तालुक्यातील कमलापूरपासून दोन किलोमीटरवरील ताटीगुडम गावात ४ सप्टेंबरला आश्चर्यजनक प्रकार समोर आला आहे. गावातील एका विहिरीला चक्क गरम पाणी येत असून, त्यामुळे परिसरात कुतूहल निर्माण झाले आहे. तालुका प्रशासन याबाबत अनभिज्ञ असून, भूगर्भातील उष्ण खडकाचा हा परिणाम असू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

हे पाणी एवढे गरम आहे की, त्यात थंड पाणी मिसळल्याशिवाय हातही घालता येत नाही, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांत मोठे कुतूहल निर्माण झाले आहे. वैज्ञानिक दृष्टीने याचा योग्य तो निष्कर्ष काढणे गरजेचे आहे.

झाले असे...

सत्यांना मलय्या कटकू (रा. ताटीगुडम) हे शेती करतात. घराजवळच त्यांनी विहीर खोदली आहे. यंदा मुसळधार पाऊस झाल्याने त्यांच्या विहिरीलाही पाणी आले. ४ सप्टेंबरला त्यांच्या विहिरीतून गरम पाणी येत असल्याचे निदर्शनास आले. ही वार्ता संपूर्ण परिसरात पोहोचली.

तहसीलदार म्हणतात, मला माहीतच नाही

यासंदर्भात अहेरीचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मला या घटनेची माहिती नाही, असे सांगितले. यासंदर्भात माहिती घेऊन सांगतो, असे ते म्हणाले. पण, उशिरापर्यंत त्यांनी याविषयी कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही.


"दगडांनी बांधलेली विहीर असेल किंवा विहिरीच्या भूगर्भात दगड अधिक असतील तर उन्हामुळे तापमान वाढते व पाणी गरम होते. याशिवाय जमिनीत गंधकाचे प्रमाण अधिक असेल किंवा ज्वालामुखी असेल तर तापमान वाढून पाणी गरम होते."
- प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरणतज्ज्ञ तथा भूगर्भ अभ्यासक

Web Title: In this village in Maharashtra, the well has hot water; You can't even put your hands in it without mixing it with cold water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.