गडचिरोली जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंच्या नावावर सुगंधित तंबाखूची आयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 19:45 IST2020-04-17T19:43:25+5:302020-04-17T19:45:14+5:30
लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या (किराणा माल) वाहतुकीला सूट असल्याचा गैरफायदा घेत प्रत्यक्षात सुगंधित तंबाखू आणि तंबाखुयुक्त पदार्थांची आयात करणाऱ्या वाहनाला चामोर्शी पोलिसांनी पकडले.

गडचिरोली जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंच्या नावावर सुगंधित तंबाखूची आयात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या (किराणा माल) वाहतुकीला सूट असल्याचा गैरफायदा घेत प्रत्यक्षात सुगंधित तंबाखू आणि तंबाखुयुक्त पदार्थांची आयात करणाऱ्या वाहनाला चामोर्शी पोलिसांनी पकडले. ही कारवाई वैनगंगा नदीच्या हरणघाट पुलावरील नाक्यावर शुक्रवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
या कारवाईत २ लाख रुपये किमतीचा तंबाखू व तंबाखूयुक्त पदार्थ आणि वाहन जप्त करण्यात आले. याशिवाय राजेंद्र जागेश्वर तिवारी (४४) आणि नागेंद्र शामराव ठाकरे (२३) दोघेही रा.कोठारी ता.बल्लारपूर यांना अटक करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करू नये यासाठी जिल्हाबंदीअंतर्गत वैनगंगा नदीच्या हरणघाट पुलावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता एमएच ३४, बीजी ७०९४ क्रमांकाचे बोलेरो वाहन किराणा साहित्य घेऊन चामोर्शीकडे जात होते. नाक्यावरील पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली असता, वाहनात किराणा साहित्यासोबत सुगंधित तंबाखू, खर्रा बनविण्यासाठी उपयोगात आणले जाणारे साहित्य आढळून आले. सदर कारवाई चामोर्शीचे पोलीस निरिक्षक जितेंद्र बोरकर यांच्या मार्गदर्शनात हवालदार संजय चक्कावार, राजकुमार चिंचेकर, रायसिंग जाधव, राहूल पारेल्लीवार, विजय दहीफडे यांनी केली.