भविष्यात मास्क लावायचा नसेल तर लस जरूर घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:27 IST2021-06-06T04:27:29+5:302021-06-06T04:27:29+5:30

गडचिरोली : लसीकरणाबाबत कोणतीही अंधश्रद्धा आणि गैरसमज न बाळगता सर्वांनी कोरोनाची लस टोचून घ्यावी. मी कालच लसीचा दुसरा डोस ...

If you do not want to wear a mask in the future, you must get vaccinated | भविष्यात मास्क लावायचा नसेल तर लस जरूर घ्या

भविष्यात मास्क लावायचा नसेल तर लस जरूर घ्या

गडचिरोली : लसीकरणाबाबत कोणतीही अंधश्रद्धा आणि गैरसमज न बाळगता सर्वांनी कोरोनाची लस टोचून घ्यावी. मी कालच लसीचा दुसरा डोस घेतला आहे. सर्वांनी लस घेतल्यास भविष्यात आपल्याला मास्क घालायची गरज पडणार नाही, असे मार्गदर्शन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. राज्यात हळूहळू अनलॉक करण्यात येत असल्यामुळे अधिक सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

सावरगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या लोकार्पणाच्या वेळी ते बोलत होते. गडचिरोलीलगत नवेगाव ग्रामपंचायतीअंतर्गत पाणी पुरवठा योजना व सावरगाव येथील आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण करण्यासाठी ते आले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, जि.प.सदस्य रामभाऊ मेश्राम, पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, डॉ. सुनील मडावी उपस्थित होते.

यावेळी ना. वडेट्टीवार म्हणाले, राज्यात आपण कोरोनावर नियंत्रण मिळविले असले तरी अजून कोरोना गेला असे समजून गाफील राहू नका. कोरोनाला हरवायचे असेल तर मास्क लावणे, तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे पालन केल्यास निश्चितच कोरोना हद्दपार करता येईल. लसीकरण केल्यामुळे कोरोना विषाणुचा प्रभाव खूप कमी होतो. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण खूप कमी करण्यास मदत होईल. लस टोचाल तर वाचाल, हे लक्षात ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यातील लसीकरण व आरोग्य सुविधांबाबत यावेळी त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हयातील कोरोना स्थितीबाबतही चर्चा करून लसीकरणाला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

(बॉक्स)

आदिवासी बांधवांशी साधला संवाद

सावरगाव येथे काही घरांबाहेर उपस्थित असलेल्या नागरिकांशी ना.वडेट्टीवार यांनी गाडीतून उतरून संवाद साधला व तेथील समस्यांबाबत चर्चा केली. गावकऱ्यांनी पाणी प्रश्नाबाबत अडचणी सांगितल्या. लगेच मंत्र्यांनी पाणी पुरवठा विभागाला समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी घरात जाऊन त्यांची विचारपूस केली.

(बॉक्स)

नवेगाव येथे पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण

जल जीवन मिशन प्रकल्पांतर्गत नवेगाव-मुरखळा ग्रामपंचायतीमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या ३.५ लक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे व पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण मंत्र्यांच्या हस्ते झाले. शहरालगत असलेली व तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ठिकाणी लोकसंख्या वाढत आहे. भविष्यात दरडोई पाणी पुरवठा वाढविण्याची आवश्यकता पडेल. त्यासाठी आताच नियोजन करा व प्रस्ताव प्रशासनास सादर करा, आपण लोकांना आवश्यक पाणी देऊ, असे आश्वासन वडेट्टीवार यांनी यावेळी दिले.

Web Title: If you do not want to wear a mask in the future, you must get vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.