वसतिगृह विद्यार्थ्यांसमोर उपासमारीचे संकट
By Admin | Updated: July 21, 2014 00:11 IST2014-07-21T00:11:08+5:302014-07-21T00:11:08+5:30
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अहेरीच्यावतीने भोजन पुरवठा निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही. तसेच कार्यरत गृहपालांनी जुन्या भोजन कंत्राटदारांकडे भोजन पुरवठा

वसतिगृह विद्यार्थ्यांसमोर उपासमारीचे संकट
अहेरी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अहेरीच्यावतीने भोजन पुरवठा निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही. तसेच कार्यरत गृहपालांनी जुन्या भोजन कंत्राटदारांकडे भोजन पुरवठा करण्याची जबाबदारी सोपविली नाही. यामुळे अहेरी येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसमोर उपासमारीचे संकट ओढावले आहे. प्रकल्प कार्यालयाच्यावतीने वसतिगृहात भोजनाची व्यवस्था न केल्यास अहेरी प्रकल्प कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी दिला आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अहेरी अंतर्गत अहेरी येथे शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह सुरू आहे. मात्र येथील कार्यरत गृहपालाच्या भोंगळ कारभारामुळे या वसतीगृहात अनेक समस्या निर्माण झाले आहेत. परिणामी येथील विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप वसतीगृहातील विद्यार्थ्यांनी केला आहे. या वसतीगृहात सध्या किती विद्यार्थी राहत आहेत. याची माहितीही अहेरी प्रकल्प कार्यालयाला देण्यात आली नाही. तशी यादीही वसतिगृहाच्या फलकावर लावण्यात आली नाही. कार्यरत गृहपालांनी संबंधित जुन्या कंत्राटदाराला भोजनाची व्यवस्था करण्याबाबत सांगितले नाही. यामुळे विद्यार्थ्यांपुढे भोजनाचा बिकट प्रश्न निर्माण झाला असल्याचेही विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. भोजनाची व्यवस्था करण्यासंदर्भात वसतीगृहातील विद्यार्थी शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कार्यरत गृहपाल तडस यांच्या निवासस्थानाकडे गेले. मात्र त्यांच्या निवासस्थानाला कुलूप लावले होते, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. गृहपाल तडस हे या वसतिगृहात रूजू झाल्यापासून येथील विद्यार्थ्यांसोबत कोणत्याही बाबतीत संवाद साधन नाही. स्वगावी गेल्यावर तीन ते चार दिवस ते गैरहजर असतात. यामुळे त्यांचे वसतिगृहातील समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे. वसतिगृहाकडे प्रकल्प कार्यालय प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
(तालुका प्रतिनिधी)