बुलंद करा विदर्भाचा आवाज !
By Admin | Updated: July 12, 2014 23:38 IST2014-07-12T23:38:01+5:302014-07-12T23:38:01+5:30
लोकसंख्येच्या प्रमाणात लाभ मिळत नसून सर्वच बाबतीत विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे. यामुळे विदर्भाचा विकास रखडला आहे. वैदर्भीय लोकांच्या अस्मितेसाठी संघर्ष करण्याची हीच योग्य वेळ आहे.

बुलंद करा विदर्भाचा आवाज !
जनजागृती कार्यक्रम : जनमंचच्या माध्यमातून विदर्भवाद्यांचे आवाहन
गडचिरोली : लोकसंख्येच्या प्रमाणात लाभ मिळत नसून सर्वच बाबतीत विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे. यामुळे विदर्भाचा विकास रखडला आहे. वैदर्भीय लोकांच्या अस्मितेसाठी संघर्ष करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे येत्या साडेतीन महिन्यात विदर्भाचा आवाज दिल्लीपर्यंत बुलंद करा, असे कळकळीचे आवाहन विदर्भवाद्यांनी केले.
येथील शिवाजी महाविद्यालयात शनिवारी आयोजित ‘लढा विदर्भा’चा या कार्यक्रमात विदर्भवादी जनमंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विदर्भ राज्याची भूमिका प्रखरपणे मांडली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनमंच संघटनेचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर होते. मंचावर चंद्रकांत वानखडे, विष्णू मनोहर, प्रा. शरद पाटील, अॅड. गोंविद भेंडारकर, नितीन रोगे, प्रकाश इटनकर, अरूण मुनघाटे आदी उपस्थित होते.
यावेळी चंद्रकांत वानखडे म्हणाले, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत सरकारला काहीही सोयरसुतक नाही. केवळ पॅकेज देऊन तसेच पीककर्ज माफ करून शेतकऱ्यांना मुर्ख बनविण्याचा प्रयत्न सरकारने केला. या पॅकेज व कर्ज माफीचा सर्वाधिक फायदा पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना झाला. आजपर्यंत नेमलेल्या सरकारच्या सर्व समित्या व आयोगांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव मंजूर केला. तसेच विदर्भ राज्याची शिफारसही केली. मात्र राजकीय इच्छाशक्तीअभावी गेल्या ६० वर्षापासून विदर्भ राज्य निर्माण होऊ शकले नाही. आता विदर्भ राज्य निर्माण करण्याची योग्य वेळ आहे. विदर्भ राज्याच्या मागणीचा विचार न करणाऱ्या उमेदवारांना आगामी विधानसभा निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय राहू नका, असेही आवाहन वानखडे यांनी केले. सरकारने केलेल्या करारानुसार वैदर्भिय जनतेला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी, शासकीय नोकऱ्या, शिक्षण व तंत्रशिक्षणात वाटा मिळाला पाहिजे. मात्र पश्चिम महाराष्ट्रातील पुढाऱ्यांच्या मानसिकतेमुळे हे सर्व विदर्भाला मिळाले नाही, असेही वानखडे म्हणाले.
यावेळी अॅड. अनिल किलोर म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षांमध्ये विदर्भातील युवकांवर अन्याय होत आहे. विदर्भातील केवळ दोन टक्केच अधिकारी नियुक्त केल्या गेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे शासकीय योजनांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचा विकास होत आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाल्यास विदर्भाचा झपाट्याने सर्वांगिण विकास होईल, असे अॅड. किलोर म्हणाले.
प्रा. शरद पाटील म्हणाले, वैदर्भिय लोकांवर गेल्या ६० वर्षापासून सातत्याने अन्याय होत आहे. मात्र विदर्भातील पुढारी गप्पच बसतात. आता विदर्भ राज्याच्या मागणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनमत चाचणीत विदर्भातील लोकांनी विदर्भ राज्याच्या बाजुने ९५ टक्के कौल दिला. गरज आहे केवळ इच्छाशक्तीची. त्यामुळे वैदर्भिय लोकांनी रस्त्यावर उतरावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक अरूण पाटील मुनघाटे तर संचालन प्रा. विलास खुणे यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)