मुख्यालय वडसाला, समादेशक कार्यालय नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 05:00 IST2020-09-21T05:00:00+5:302020-09-21T05:00:29+5:30
२० फेब्रुवारी १९९३ ला राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ ची स्थापना झाली. नागपूरच्या गट क्रमांक ४ मधून याचे काम सुरू झाले. काही वर्षानंतर विसोराजवळच्या बदक पैदास केंद्राला लागून असलेली १५० एकर जागा या गट १३ ला देण्यात आली. कोट्यावधी रुपये खर्च करून कँम्पच्या पहिल्या टप्प्यातील बांधकाम पण पूर्ण झाले. त्यात समादेशक कार्यालय पूर्णत्वास आले आहे.

मुख्यालय वडसाला, समादेशक कार्यालय नागपुरात
अतुल बुराडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : नक्षल कारवायांचा बिमोड करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २८ वर्षांपूर्वी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ ची स्थापना केली. परंतु त्यावेळी गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दलाची सुरक्षा, दळणवळण, प्रशासकीय सोईच्या दृष्टीने उपयुक्त शासकीय जागा उपलब्ध झाली नसल्याने समादेशक कार्यालय नागपुरात ठेवण्यात आले. आता विसोरानजिक समादेशक कार्यालय व कर्मचारी निवासस्थानासाठी शासकीय जागा उपलब्ध करून दिली आहे. दीड वर्षांपूर्वी समादेशक कार्यालय व पहिल्या टप्प्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे कामही पूर्ण झाले आहे. पण अजूनही या गटाचा कारभार नागपुरातूनच सुरू आहे.
२० फेब्रुवारी १९९३ ला राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ ची स्थापना झाली. नागपूरच्या गट क्रमांक ४ मधून याचे काम सुरू झाले. काही वर्षानंतर विसोराजवळच्या बदक पैदास केंद्राला लागून असलेली १५० एकर जागा या गट १३ ला देण्यात आली. कोट्यावधी रुपये खर्च करून कँम्पच्या पहिल्या टप्प्यातील बांधकाम पण पूर्ण झाले. त्यात समादेशक कार्यालय पूर्णत्वास आले आहे. या गटास मंजूर असलेल्या सात कंपन्यांपैकी एका कंपनीचे अधिकारी, कर्मचारी विसोरा नजीकच्या कँम्पमध्ये राहात आहेत.
सोबतच समादेशक कार्यालयाचे बांधकाम झाले असूनही राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १३ ची संचालन व्यवस्था सांभाळणारे समादेशक कार्यालय नागपूर येथेच आहे. गट एकीकडे आणि तब्बल २८ वर्षांपासून समादेशक कार्यालय नागपुरात अशी स्थिती आहे. जिल्ह्याची भौगोलिक रचना व नक्षलवाद्यांच्या कारवायांचा विचार करता अधिकाऱ्यांचा पोलीस दलांसोबत तातडीने समन्वय होऊन वेळीच हालचाल होणे गरजेचे असते. त्यामुळे संपूर्ण गटाला निर्देश देणारे समादेशक, व इतर अधिकारी यांचे मुख्यालयी असणे आवश्यक असते.
वरिष्ठांशी पत्रव्यवहार, पण अजून दखल नाही
विसोरानजीक देसाईगंज हे तालुका मुख्यालय आहे. या ठिकाणी मोठी बाजारपेठ, रेल्वे, नगरपालिका व मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध असल्याने दळणवळण करण्यासाठी साधने उपलब्ध आहेत. या संदर्भात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी जुलै २०२० ला नागपूर येथील समादेशक कार्यालय विसोरा येथील मुख्यालयी स्थानांतरण करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस महासंचालक, अप्पर पोलीस महासंचालक मुंबई, पोलीस उपमहानिरीक्षक, राज्य राखीव पोलीस बल नागपूर परिक्षेत्र यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र अद्याप त्यावर हालचाली झालेल्या नाहीत.