विद्यार्थिनींना सुरक्षेविषयी मार्गदर्शन
By Admin | Updated: August 9, 2014 01:14 IST2014-08-09T01:14:40+5:302014-08-09T01:14:40+5:30
महिला महाविद्यालयाच्या महिला अध्ययन कल्याण केंद्र जागृती सेल व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने महिला महाविद्यालयात ....

विद्यार्थिनींना सुरक्षेविषयी मार्गदर्शन
गडचिरोली : महिला महाविद्यालयाच्या महिला अध्ययन कल्याण केंद्र जागृती सेल व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने महिला महाविद्यालयात महिला सुरक्षा या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हंसा तोमर होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय स्त्री संघटनेच्या महाराष्ट्र प्रांताध्यक्षा माधुरी साकुळकर, विदर्भ प्रतिनिधी मनीषा सांबरे, प्रमुख अतिथी म्हणून संध्या देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना साकुळकर यांनी भारतीय स्त्रीशक्ती संघटनेच्या मार्फतीने राबविण्यात येणाऱ्या महिला सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. महिलांनी आज प्रत्येक क्षेत्र काबीज केले आहे. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत कारखाना, कंपनी, कार्यालय आदी ठिकाणी काम करावे लागते. त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. महिलांनी स्वत:ची सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केले. महिला सुरक्षेबरोबरच महिलांचे आरोग्य, शिक्षण, स्त्रीभ्रूणहत्या, लैंगिक शोषण, आॅनर किलींग, एकतर्फी पे्रमातून घडणाऱ्या घटना, सायबर क्राईम आदींवर विस्तृत प्रकाश टाकला.
मनिषा सांबरे यांनी संघटनेची स्थापना करण्यामागे असलेला हेतू स्पष्ट करून या संघटनेच्या विविध कार्यांवर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणातून प्राचार्या डॉ. हंसा तोमर यांनी स्वत:ची सुरक्षा स्वत:च करण्याचे आवाहन केले.
संचालन प्रा. लता सालोरकर यांनी केले. तर आभार प्रा. परिणीता घडूले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. लोखंडे, प्रा. सातपूते, प्रा. गहरेवार, प्रा. बोधाने, प्रा. पाटील, प्रा. त्रिपाठी, प्रा. मुळे, प्रा. साळवे, प्रा. वैद्य, प्रा. पारखी, प्रा. शेंडे, प्रा. राजकोंडावार, प्रा. बुरले यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)